
राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा संपन्न
पुणे ः ‘पथनाट्याकडे केवळ करमणुकीचा प्रकार म्हणून पाहणे योग्य नाही. पथनाट्य हे प्रबोधन करून समाजमन घडवण्याचा महत्त्वाचा नाट्यप्रकार आहे’, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी मंचातर्फे आयोजित कर्मवीर करंडक आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, साहित्यिक श्रीरंजन आवटे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून २७ महाविद्यालये सहभागी झाले होते. नाशिकच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाने प्रथम, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने द्वितीय व जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने यात तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेच्या कार्याध्यक्षा प्रा. डॉ. सविता पाटील यांनी केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बी. एस. पाटील यांनी आभार मानले.