
सव्वादोनशे कोटीच्या कामांचे उद्घाटन अन् भूमिपूजन
प्रकल्पांच्या उद्घाटन, भूमिपूजनाला मुहूर्त
पुणे महापालिका ः २३२ कोटींची कामे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पुणे, ता. १२ ः महापालिकेत राजकीय पक्ष सत्तेत असल्यानंतर प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन धूमधडाक्यात होतात. परंतु, गेल्या १० महिन्यांपासून प्रशासकराज असताना प्रथमच २३२ कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १४) होत आहे.
शहरात सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात महापालिकेची मुदत संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोचे उद्घाटन, नदी काठ सुधार, जायका या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. पण त्यानंतर महापालिकेवर प्रशासक आल्याने असे मोठे कार्यक्रम झाले नव्हते. गेल्या काही महिन्यांत प्रशासनाने मोठे निर्णय घेतले. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत ११० कोटी, जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण आणि बीआरटीचे भूमिपूजन ६८ कोटी, बावधन बुद्रूक गावातील समान पाणी पुरवठा योजना २२ कोटी या तीन कामांचे भूमिपूजन होणार आहे. तर गोल्फ क्लब चौकात ३२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे.
तसेच गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले काही प्रकल्प पूर्ण झाल्याने त्यांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी दुपारी तीन वाजता येरवड्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिरात होईल. या वेळी एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व स्थानिक खासदार, आमदारांना निमंत्रित केले आहे.
दोन प्रकल्प वगळले
मुठा नदीवरील कर्वेनगर-सनसिटी या पुलाचे भूमिपूजन आणि शिवणे ते खराडी रस्त्यातील ६ किमीच्या कामाचा टप्पा या दोन प्रकल्पांचाही या कार्यक्रमात समावेश होता. पण कर्वेनगर-सनसिटी या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने हे काम सुरू होण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर, खराडी- शिवणे ६ किमीच्या टप्प्याचेही तांत्रिक अडचणीमुळे उद्घाटन होणार नाही.