
पुणे स्टेशनवरून मुलाला पळविणाऱ्यास अटक
पुणे, ता. १२ : दारूच्या नशेत असलेल्या महिलेला चुकवून एकाने तिच्या सहा वर्षांच्या मुलाला पळवून नेल्याची घटना पुणे स्टेशन येथे घडली. पोलिसांनी आरोपीला गुलबर्गा येथून अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.
इक्बाल हसन शेख (वय ३२, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला ही पिंपरी येथील असून, तिला दारूचे व्यसन आहे. ती आपल्या मुलासह ९ जानेवारीला पुणे स्टेशन येथे आली होती. तेथे तिने इक्बाल शेख याच्यासोबत दारू प्यायली. नशेत झोपी गेल्यानंतर आरोपी शेख हा तिच्या मुलाला घेऊन पसार झाला. महिलेला पहाटे जाग आल्यानंतर मुलगा सोबत नसल्याचे लक्षात आले. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तसेच, तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेतला तेव्हा आरोपीने मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.