१९१ जोडप्यांची सेकंड इनिंग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१९१ जोडप्यांची सेकंड इनिंग सुरू
१९१ जोडप्यांची सेकंड इनिंग सुरू

१९१ जोडप्यांची सेकंड इनिंग सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : पत्नी किंवा पत्नीचे निधन झाले आहे. म्हतारपणात मुलांनी साथ सोडली. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मुल जवळ नसतात. लग्नच केलेले नाही. पालक आणि मुलांत काही कारणांवरून वाद आहेत, अशा एक ना अनेक कारणांमुळे ५० वय पार केलेल्या अनेकांच्या आयुष्यात एकटेपणा आलेला असतो. उतारवयात एकट्याला जगावे लागू म्हणून देशातील १९१ जोडप्यांनी अनुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांची सेकंड इनिंग नव्या साथीदारासह सुरू केली आहे.

वय झाल्यानंतर एकट्या पालकांचा कुटुंबातील इतर व्यक्तींशी कमी झालेला संवाद व त्यातून निर्माण झालेले एकटेपणा दूर करण्याच्या प्रयत्नांतून ‘अनुबंध फाउंडेशन’ मार्फत या १९१ जोडप्यांची लग्न लावून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यात जाती-धर्माची बंधने पाळण्यात आलेली नाहीत. तसेच लग्न करीत असताना कोणाची फसवणूक होणार नाही, याची देखील काळजी फाउंडेशनकडून घेण्यात आली आहे.
याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष नुटभार्इ पटेल यांनी सांगितले की, २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या भूकंपात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकांचे साथीदार गेले. साथीदार नसलेल्यांचे पुन्हा लग्न लावून देणे गरजेचे असल्याचे त्यावेळी लक्षात आले. तेव्हापासून मी ज्येष्ठाचे लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर यासाठी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. एकटेपणाने ग्रासलेल्या उतारवयातील व्यक्तींना साथ मिळावी हा आमचा हेतू आहे. त्यासाठी वरिष्ठांचा परिचय मेळावा आम्ही आयोजित करतो. त्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचे बंधन ठेवत नाही. सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे वय ५० ते ८० दरम्यान असावे, अशी अट ठेवली आहे. यात कोणाचीही फसवणूक होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. देशातील विविध ठिकाणच्या लायन्स क्लबने आम्हाला यात मदत केली आहे.

एकाकीपणा घालविण्याचा प्रयत्न

कुटुंब विस्कळित होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक ज्येष्ठांचे आयुष्य एकाकी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात निराशा देखील येते. कुटुंबातील कोणताही व्यक्ती बरोबर नसेल तर एकट्याने आयुष्य जगणे सोपे नाही. त्यामुळे आम्ही देखील एकटे असलेल्या ज्येष्ठांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती फाउंडेशनसोबत काम करीत असलेल्या ‘सहजभेट’च्या संस्थापक सरिता आव्हाड यांनी दिली.

याची होते तपासणी :
- आधारकार्ड
- घटस्फोटाचे प्रमाणपत्र
- साथीदाराचे मृत्युपत्र
- इच्छुक व्यक्ती एकटी आहे का?

अनुबंध फाउंडेशनचे आतापर्यंतचे कामकाज
- वरीष्ठजन परिचय मेळावे - ७१
- फाउंडेशनकडे असलेले बायोडेटा - १५२१५
- फाउंडेशनमार्फत झालेली लग्न - १९१