डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचा आदेश
डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचा आदेश

डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचा आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘तुला चांगला स्वयंपाक बनवता येत नाही, रूढी-परंपरांचे काटेकोरपणे पालन करायचे,’ असे म्हणत मानसिक छळ केलेल्या डॉक्टर पत्नीला पतीने दरमहा १५ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. पती-पत्नीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणातील पत्नी बीएएमएस डॉक्टर, तर पती कनिष्ठ संशोधक आहे. त्यांचे १५ मे २०१९ रोजी लग्न झाले. लग्नाला काही महिने उलटल्यानंतर त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. ‘तुला चांगला स्वयंपाकच बनवता येत नाही,’ असे म्हणत पती रूपेश पत्नी रीनाला मानसिक त्रास देत. तसेच कुटुंबात सर्व रूढी-परंपरांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, अशी सक्ती सासरच्या मंडळींची असायची. मासिक पाळीच्या चार दिवसात तिला घरात बाजूला बसविले जात. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळे तिने अखेर पतीसह सासू व दिराविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. स्वतःच्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी रीना यांनी पोटगीचा दावा दाखल केला. पत्नीच्यावतीने ॲड. नीता भवर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

रीना यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. रीना या नोकरीतून दरमहा ३० हजार रुपये कमवीत आहेत. मात्र, त्यांनी वडिलांच्या उपचारांसाठी कर्ज काढले होते. तसेच त्यांच्यावर आईचीदेखील जबाबदारी आहे. भावाचे लग्न झाल्यानंतर तिला माहेरच्या घरात राहणे शक्य नाही. पती तिच्यापेक्षा अधिक कमवीत आहे. दोघेही विभक्त राहात असताना पतीने पत्नीचा कोणताही खर्च उचलला नाही. त्यामुळे दोघांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पत्नीला अंतरिम पोटगी मिळण्याचा युक्तिवाद ॲड. भवर यांनी केला. न्यायालयाने ॲड. भवर यांचा युक्तिवाद मान्य करीत रीना यांना एक जुलै २०२१ पासून दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला.