
एकाची कुटुंबातील चौघांची आत्महत्या
पुणे, ता. १३ : शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे एका कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केशवनगर, मुंढवा परिसरात शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपक पुंडलिक थोटे (वय ५९), इंदू दीपक थोटे (वय ४५), ऋषिकेश दीपक थोटे (वय २४), समीक्षा दीपक थोटे (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना केशवनगर, मुंढवा परिसरात घडली. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. थोटे यांची ‘पैसा डॉट. कॉम’ या नावाची कंपनी असल्याचे समजते. या कंपनीत त्यांना आर्थिक नुकसान झाल्यामुळे कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु, वैद्यकीय तपासणीनंतर नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती मुंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली.