आमची चूक काय? आम्हाला शिक्षा कशाची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमची चूक काय? आम्हाला शिक्षा कशाची?
आमची चूक काय? आम्हाला शिक्षा कशाची?

आमची चूक काय? आम्हाला शिक्षा कशाची?

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः राज्यातील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुमारे चार वर्षांपासून लटकलेली आहे. त्यात प्रत्येकवेळी जाहिरात काढून सातत्याने भरती रद्द केली जात आहे. भरती प्रक्रिया जाहीर करणे अन् मग ती रद्द करणे, हा एक खेळ सुरू आहे. मात्र हाल होत आहेत ते या प्रक्रियेसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांचे. यात आमची काय चुक आहे?, आम्हाला का शिक्षा मिळत आहे?, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया चार वर्षांपासून स्थगित असून यासंबंधी ‘सकाळ’ला आलेल्या निवडक प्रतिक्रिया...

जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये जाहीर झालेल्या भरती प्रक्रियेसाठी तीन जिल्ह्यातून अर्ज केला होता. या प्रक्रियेतील परीक्षेसाठी तीनवेळा शुल्क भरले. मात्र ही प्रक्रियाच रद्द झाली. त्यात आताच्या राज्य सरकारकडून ही अपेक्षा होती. मात्र, ते देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत.
- चेतन भारंबे

मी २०१९ ला पशुसंवर्धन विभागातील भरतीसाठी अर्ज भरला होता. पण अजूनही त्याची परीक्षा घेतली नाही. एक वेळा परीक्षा प्रवेशपत्र पण आले होते, पण अचानक परीक्षा पुढे ढकलली होती. तिथून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती किंवा मेसेज आला नाही. मी एक अत्यंत गरीब घरचा विद्यार्थी आहे आणि दिव्यांग आहे. माझे शिक्षण पण खूप झाले आहे. आजपर्यंत मी फक्त नोकरीच्या आशेवर जीवन जगत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर लक्ष केंद्रित करून ही प्रक्रिया पूर्ण करावी.
- नामदेव वाघ, ठाणे

आरोग्य विभाग भरतीबाबत ग्रामविकास विभागाचे ऑक्टोबरमध्ये जेव्हा वेळापत्रक आले होते, तेव्हाच शंका होती ती खरी ठरू नये म्हणजे मिळवले. जानेवारीपर्यंत जर जाहिरात नाही आली तर मात्र सिद्ध होईल की संबंधित विभागाची परीक्षा घेण्याची मानसिकताच नाही. तलाठी, नगरपरिषद भरतीची पण अशीच अवस्था आहे. त्यात २०१९ च्या पदभरती प्रक्रियेसाठी भरलेल्या अर्जाचे शुल्क देखील परत करण्याचा विचार नाही.
- नीलेश पुरंधर, पुणे

मुळात भरती प्रक्रियेसाठी पोर्टल कंपनीला नेमले, त्या कंपनीने केवळ पैसे कमविण्याचे काम केले. त्यात अशा प्रक्रियेत कित्येक बनावट उमेदवार (डमी उमेदवार) सहभाग घेतात. त्यामुळे राज्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे, हे यातून दिसते.
- विनय राठोड

मी २०१९ मध्ये आरोग्य सेवक पदासाठी अर्ज भरला होता. ती परीक्षा अद्याप झाली नाही. आमच्या भावनांशी खेळले जात आहे. अभ्यास करून देखील परीक्षा होत नसल्याने मानसिक ताणही वाढत आहे. सरकार खरंच जिल्हा पदभरती बद्दल उदासीन आहे. शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आणि लवकर याबाबत निर्णय घ्यावा.
- संपत बडे, अहमदनगर

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचे तीन वेळा वेळापत्रक जाहीर करून स्थगित करण्यात आली. तर आता भरती प्रक्रिया नव्याने करीत आहेत. त्याची जाहिरात १ ते ७ जानेवारीला प्रसिद्ध होणार होती; परंतु अजून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. दरम्यान यासाठीची परीक्षा २५ व २६ मार्च २०२३ रोजी होणार आहे. आता हात जोडून सरकारला विनंती करत आहे की, जाहिरात लवकर जाहीर करून परीक्षा ठरलेल्या तारखांच्या दिवशीच घ्याव्यात.
- संतोष डंग, कोल्हापूर

एमपीएससीच्या जागा कमी आणि तयारी करणारे पाच लाखांपेक्षाही अधिक उमेदवार. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी. सरळसेवा भरतीकडे सर्व उमेदवारांची धाव असते, पण शासनाने वारंवार जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्द केल्याने उमेदवार मानसिक तणावाखाली आहेत. रद्द केलेल्या भरती प्रक्रियेचे अर्ज शुल्क परत करणार की नाही?, ही पण शंका आहे.
- अशोक पवार, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या २०१९ च्या जाहिरातीसाठी मी अर्ज केला होता. परंतु आता वयोमर्यादा ओलांडली असल्याने मी यास पात्र नाही. मात्र
सरकारने आता जरी ही परीक्षा घेतली तर नक्कीच मला न्याय मिळाला असे मला वाटेल. कारण कित्येक उमेदवार आहेत जे यासाठी पात्र असून त्यांना कदाचित ही संधी मिळू शकते.
- संपत जोगदंडे, औरंगाबाद