
आता एकाचवेळी मिळवा दोन पदवी उपाययोजना करण्याचे विद्यापीठांना ‘यूजीसी’चे आदेश
पुणे, ता. १४ : एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची सुविधा विद्यापीठ अनुदान आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. याप्रकारे दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांअभावी शिक्षणसंस्थांकडून कोंडी केली जात आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठांनी सुलभ यंत्रणा विकसित करावी आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करत आयोगाने विद्यापीठांना सुनावले आहे.
शिक्षणसंस्थांकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला देण्याची मागणी केली जात आहे. मात्र ही कागदपत्रे एका पदवी अभ्यासक्रमासाठी दिली असल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता प्रवेश देण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. आतापर्यंत विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करण्याची मुभा नव्हती. परंतु १३ एप्रिल २०२२ मध्ये आयोगाने याबाबत मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या. त्यानंतर देशभरातील सर्व विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांना या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करावी, असे ३० सप्टेंबर २०२२च्या परिपत्रकाद्वारे आयोगाने स्पष्ट केले.