खंडणीखोरांमुळे सहा हजार कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीखोरांमुळे सहा हजार कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर
पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट
खंडणीखोरांमुळे सहा हजार कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

खंडणीखोरांमुळे सहा हजार कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : पुणे ही मनुष्यबळाची खाण असल्याने इथे गुंतवणूकदार आकृष्ट होत आहेत. पण इथल्या गुन्हेगारीमुळे सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प कर्नाटकात गेला असा गौप्यस्फोट करत या खंडणीखोर, वसुलीवाल्यांना ठेचून काढा अन्यथा तुमच्यावरच कारवाई केली जाईल, अशी कडक शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तंबी दिली. फडणवीस यांनी भर कार्यक्रमात ही माहिती दिली. पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रात फोफावलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलिसांची आज (शनिवारी) सकाळीच मी बैठक घेतली. आपल्याकडे उद्योजक यायला तयार झाले आहेत, पण त्यामध्ये उद्योजकांना, गुंतवणूकदारांना ब्लॅकमेलर त्रास देत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे, गटाचे, जातीचे, धर्माचे का असेनात त्यांना सोडू नका. या सर्वांच्या मुसक्या बांधून त्यांना जेलमध्ये टाका, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’

आपल्याकडे उद्योगपती यायला तयार आहेत. पण, खंडणीखोरांची इकोसिस्टिम तयार झाली आहे. काही जणांकडे माथाडीचा परवाना नसतानाही ते वसुली करत आहेत. आम्हालाच कंत्राटं मिळाली पाहिजेत म्हणून दादागिरी करत आहेत. अशी मानसिकता असणाऱ्यांची कंबरडे मोडणार आहोत. आज दुपारी मला एक उद्योगपती भेटले. वर्षभरापूर्वी आम्ही सहा हजार कोटींची गुंतवणूक करायचे ठरवले होते. पण त्यानंतर आम्हाला धमक्या मिळाल्या, वसुलीसाठी संदेश पाठविण्यात आले. त्यामुळे आम्ही ६ हजार कोटींची गुंतवणूक कर्नाटकामध्ये नेली. ही अवस्था आपल्याकडे होणार असेल, तर भविष्यामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही. म्हणून काय वाट्टेल ते झाले तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘उद्योगामध्ये राजकारण आणू नका’
मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आपल्याकडे येत आहेत. पुणे जिल्हा हा मनुष्यबळाची खाण असल्याने ते आपल्याकडे आकर्षित होत आहेत. इथे जर आपण औद्योगिक वातावरण चांगले ठेवू शकलो नाही, तर ते कसे येतील. उद्योगामध्ये राजकारण आणू नका असे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करतो. तसेच, उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण झालेच पाहिजे. जसे मुंबई आपले विकासाचे इंजिन आहे, तसे पुणे हे दुसरे इंजिन आहे. दुप्पट वेगाने व क्षमतेने हे धावले पाहिजे यासाठी राज्य सरकार लक्ष देईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.