
कृतज्ञता बाळगली तर यश नक्की मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
पुणे, ता. १४ : ‘‘प्रत्येकाचे काम आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. त्यामुळे कधीही कुणाला कमी लेखू नका. आई, वडील, मित्र आणि सहकाऱ्यांप्रती नेहमी कृतज्ञ राहा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या यशात सहभागी असलेल्यांची कृतज्ञता बाळगली, तर न्यायोचित काम करता येते आणि त्यातून यश नक्की मिळते, असा सल्ला मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सर परशुराम महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने फणसळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अध्यक्ष सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाविद्यालयाचे अध्यक्ष केशव वझे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष दिलीप शेठ, रमेश पाटणकर यांच्यासह फणसळकर यांच्या इंग्रजीच्या शिक्षिका तारा थोरात आणि पत्नी मेघा फणसळकर आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या फणसळकरांनी जुन्या आठवणींना या वेळी उजाळा दिला. कनिष्ठ महाविद्यालयात सर्वाधिक स्नेह मला मिळाल्याचा कृतज्ञताभाव त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचे यश हीच आमची संपत्ती असल्याचे सांगताना फडके म्हणाले, ‘‘चांगला विद्यार्थी मिळणे, त्याला शिकवणे, तो आयुष्यात यशस्वी होणे आणि त्याने महाविद्यालय किंवा शिक्षकांप्रती कृतज्ञता दाखविणे हा दुर्मीळ योग आहे. फळसळकरांच्या यशात आमचे समाधान असून, राष्ट्राला कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मिळत राहो. हीच खरी संपत्ती आहे.’’ माजी पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे, तारा थोरात आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
फणसळकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला...
- खात्री बाळगून प्रयत्न करा, उगाचच शंका घेऊ नका
- गंतव्यस्थानाचा विचार करू नका, तर प्रवासाची मजा घ्या
- वेळेचे महत्त्व जाणून घ्या, ती कधी फुकट घालवू नका
- जे कराल ते आनंदाने आणि मनापासून करा, तरच सामर्थ्य प्राप्त होते
- आयुष्याच्या वाटचालीत संस्कार आणि मार्गदर्शन दीपस्तंभ म्हणून काम करतात
- स्वतःपुरते सीमित राहू नका, दुसऱ्यासाठी काही करण्याचा आनंद वेगळाच
- तुमच्या कामावर विश्वास निर्माण करा
१८३९४