‘प्रवास’ २५ वर्षांचा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रवास’ २५ वर्षांचा !
‘प्रवास’ २५ वर्षांचा !

‘प्रवास’ २५ वर्षांचा !

sakal_logo
By

भास्कर सगर हा खरंतर उपयोजित कला शाखेचा विद्यार्थी; परंतु निसर्गचित्रांची आवड सातत्याने जपणारा कलाकार. आपला पोटापाण्याचा व्यवसाय इमाने इतबारे करत असतानाच त्याने आपल्या निसर्गचित्रण आवडीला एक वेगळंच रूप देऊन पंचवीस वर्षांपूर्वी एका विशिष्ठ संकल्पनेवर निसर्गचित्र प्रदर्शन आणि त्याच चित्रांवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि भास्कर सगरच्या कलायात्रेचा एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला.
- डॉ. सुधाकर चव्हाण, माजी प्राध्यापक, अभिनव कला महाविद्यालय, पुणे

खरंतर अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृतीची दिनदर्शिका प्रसिद्ध केली; परंतु भास्करचा उपक्रम या सगळ्या कलाकारांपेक्षा वेगळा आहे. २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रदर्शन आणि दिनदर्शिका निर्मितीच्या प्रत्येक वर्षी त्याने वेगवेगळे विषय घेऊन काम केले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचा हा उपक्रम नित्याने होतो; पण तयारी मात्र बरीच आधी होती.
आपल्या उपक्रमातील चित्रात नेहमीच नाविन्य असले पाहिजे, या विचाराने तो प्रत्येक वर्षी आपला विषय मनाशी ठरवून त्यानुसार त्याची चित्रनिर्मितीची मोहीम सुरू होते. त्याच्या चित्रात प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि त्या मुळेच २५ वर्षांपूर्वीचे त्याचे ग्राहक आजही त्याच्यासोबत आहेतच; पण दरवर्षी नवनवीन कलारसिक, आस्थापना त्याच्या या दिनदर्शिका मोहिमेत सहभागी होत आहेत.
त्याची सुरुवात मला आठवते. पुण्याची ओळख असणारी ठिकाणे, विशिष्ट वास्तूपासून त्याचे विषय प्रतिवर्षी बदलत गेले. महाराष्ट्रातील लेणी, सागर किनारे, भारतातील मंदिरे, हंपीसारख्या प्राचीन सांस्कृतिक आणि कलावारसा असणारी ठिकाणे अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जावून जागेवर चित्रण करणे, हे त्याचे वैशिष्ट्य ठरले. अशा ठिकाणी जाण्याचा प्रवास, राहणे, चित्रण, कधी फोटोग्राफी करण्याचे व्यवस्थित पूर्व नियोजन करून पर्यटन, कलानिर्मिती, विविध प्रदेश, स्थानिक संस्कृती, स्थानिक लोकांचा परिचय करून घेणे हा त्याचा स्थायिभाव झाला आहे. त्याच्या या वाटेवर अनेक बरे वाईट अनुभव त्याने घेतले. त्याच्या या उपक्रमाच्या वेळी कर्नाटकमधील हंपी या ठिकाणी तो चित्र काढत असताना तिथल्या राजघराण्यातील तत्कालीन महाराजांनी दाखविलेले प्रेम, स्नेह, आदर आणि केलेले सहकार्य याबद्दल तो भरभरून बोलतो. गेल्या २५ वर्षांतील असे सुखाचे क्षण त्याने बऱ्याच वेळा अनुभवले आहेत.
जलरंग हे त्याचे आवडते माध्यम. या जलरंग शैलीतील रंगांची प्रवाही हताळणी, जलरंगातील ताजेपणा, खूप काही काम न करता नेमक्या आणि मोजक्या फटकार्यातून सुयोग्य परिणाम साधणे हे भास्करच्या शैलीत नेहमीच दिसून येते. जानेवारी २००३ मधला त्याचा हा उपक्रम पंचवीस वर्षे पूर्ण करतोय. कोरोनाची दोन वर्षेही त्याच्या या उपक्रमात खंड पडलेला नाही. १८ जानेवारीपासून पत्रकारनगरमधील दर्पण आर्ट गॅलरीत त्याच्या २५ विषयांच्या २५ चित्रांचे आणि २५ दिनदर्शिकेचे प्रदर्शन होत आहे. कलारसिकांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी.