
कोंढव्यात तरुणाच्या खुनाचा कट उधळला
पुणे, ता. १८ : जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्याचा रचलेला कट गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
समीर शेख (वय १९, रा. कोंढवा), शाहीद शेख (वय २६, रा. कोंढवा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कुऱ्हाड, कोयता, तलवार आणि गुप्ती अशी हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालिद सय्यद (रा. कोंढवा) याचे काही महिन्यांपूर्वी सलमान (रा. मोमीनपुरा) याच्याशी भांडण झाले होते. तेव्हा सलमान याने खालिदला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी खालिद आणि त्याचे साथीदार सलमानचा खून करण्याच्या तयारीत असून, ते १७ जानेवारी रोजी कोंढव्यातील गोयल गार्डनच्या पाठीमागे एकत्रित जमणार असल्याची माहिती युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.