सकारात्मक परिणाम करणारी कार्यपद्धत हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मक परिणाम करणारी कार्यपद्धत हवी
सकारात्मक परिणाम करणारी कार्यपद्धत हवी

सकारात्मक परिणाम करणारी कार्यपद्धत हवी

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ‘‘कराच्या माध्यमातून सरकारकडे कोट्यवधी रुपये जमा होत असतात. त्या पैशांचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वापर करीत असताना प्रकल्पांचा नागरिकांना थेट काय फायदा झाला याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. नागरिकांवर सकारात्मक परिणाम होर्इल, अशी सरकारची कार्यपद्धती हवी,’’ असे मत आर्थिक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांनी व्यक्त केले.

आगामी अर्थसंकल्पात काय असले पाहिजे यावर आयोजित ‘जनअर्थसंकल्प’ या कार्यक्रमाचे नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यात ‘समग्र मानव विकास आणि संशोधन केंद्रा’चे (सीएचएचडीआर) संचालक विश्वेश्वर रास्ते, नूपुर देशकर, निकुंज चौधरी आणि पर्यटन विषयात पीएच.डी. केलेल्या डॉ. दिशा मिश्रा सहभागी झाल्या होत्या.

रास्ते म्हणाले, ‘‘नागरिकांना कर भरत असल्याचा फायदा मिळत असेल तर ते कर भरायला तयार होतात. अर्थसंकल्पात आपण मोठमोठ्या घोषणा करतो, पण त्याचा प्रत्यक्ष फायदा किती झाला याचा गांभीर्याने विचार व्हावा. एखादी सेवा सुरू केल्यानंतर तेथील कर्मचारी नागरिकांशी नीट वागले तर त्या सेवेचा व्याप वाढतो नाहीतर ती बंद करावी लागते. सरकारच्या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि सरकारी कामात पारदर्शकता हवी.’’

डॉ. मिश्रा म्हणाल्या, ‘‘जग समजून घेण्यासाठी पर्यटन हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. पर्यटनासाठी पायाभूत सुविधा आणि त्या सुविधांची देखभाल हवी. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद हवी. त्यामुळे देखभालीसाठी एकाच वेळी मोठा खर्च करावा लागणार नाही. त्याबरोबर पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली गेली पाहिजे. चौधरी म्हणाले, ‘‘सरकारने केवळ रिटेलच्या करावर आधारित राहण्यापेक्षा इतर मार्गांचाही विचार करावा, हीच स्थिती इंधनाच्‍या बाबत आहे.’’

प्रकल्पांचा रिअल टाइम डेटा असावा!
‘‘कोणताही मोठा प्रकल्प सुरू करीत असताना त्याची गरज लक्षात घेतली पाहिजे. तसेच तो प्रकल्प राष्ट्रीय हिताचा हवा. त्यासाठी आवश्‍यक बजेट, जागा, उपयुक्तता, देखभाल आदी सर्व बाबी प्रत्यक्षात शक्य आहेत का याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचा रिअल टाइम डेटा असावा,’’ असे देशकर म्हणाल्या.