पाणी बचतीसाठी पाऊल पढते पुढे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी बचतीसाठी पाऊल पढते पुढे!
पाणी बचतीसाठी पाऊल पढते पुढे!

पाणी बचतीसाठी पाऊल पढते पुढे!

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध झाल्यानंतर उरलेले पाणी फिल्टर बेडमधून नाल्यामध्ये सोडून दिले. पण आता या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी नवीन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यातून पर्वती जलकेंद्रातून रोज १० एमएलडी आणि वारजे जलकेंद्रातून १२ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी पावणेपाच कोटी रुपये खर्च येणार आहे.
पुणे शहरात सध्या ४० टक्के पाण्याची गळती होत आहे. महापालिका रोज १८०० एमएलडी पाण्याचा वापर करत असून, त्यापैकी ४० टक्के म्हणजे ७२० एमएलडी पाणी वाया जात आहे. समान पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ही गळती ५० टक्क्यांनी म्हणजे दैनंदिन गळतीचे प्रमाण ३६० एमएलडी पर्यंत खाली येणार आहे. असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

काय होते, काय होणार?
- पुणे महापालिकेच्या जल केंद्रांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी प्रक्रिया केली जाते
- त्यामध्ये सर्वांत शेवटी जे अशुद्ध पाणी आहे ते नाल्यांमध्ये सोडून दिले जाते
- पण या पाण्यावर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून ते शुद्ध करणे शक्य आहे
- महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रातून रोज १० एमएलडी तर वारजे जलकेंद्रातून १२ एमएलडी पाणी नाल्यात सोडून दिल्याने अपव्यय
- नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही अपव्यय रोखणे शक्य होणार
- अशा प्रकारची यंत्रणा सध्या भामा आसखेड जलकेंद्रात असून तेथे रोज ७ एमएलडी, नवा पर्वती जलकेंद्र १० एमएलडी पाण्याची बचत

निधी अन् खर्चाचे गणित
- केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगातून पुणे महापालिकेला या कामासाठी निधी उपलब्ध
- पर्वती येथील वॉटर बेडमध्ये बदल करण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपये खर्च
- वारजे येथे १२ एमएलडी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च
- त्यास पूर्वगणनपत्रक समितीची (इस्टिमेट कमिटी) मंजुरी
- जुना वडगाव, लष्कर, होळकर जलकेंद्रात ही यंत्रणा अद्याप बसलेली नाही
- त्यामुळे रोज नऊ एमएलडी पाणी वाया

४० टक्के पाणी गळतीमध्ये जलकेंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर उर्वरित जे पाणी सोडून दिले जाते त्याचाही समावेश आहे. पण आता हे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी जलकेंद्रातील यंत्रणेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल केल्याने रोज २२ एमएलडी पाण्याची बचत होईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

२.९४ कोटीचा दंडही कमी होणार
पुणे महापालिका अतिरिक्त पाणी वापर करते त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला दंड ठोठावला जातो. या दोन जलकेंद्रातील यंत्रणेत केल्या जाणाऱ्या बदलामुळे दंडाची रक्कम कमी होऊन पैशाची बचत होईल. पर्वती जलकेंद्रातील पाणी बचतीमुळे १.४४ कोटी आणि वारजे जलकेंद्रातून १.५० कोटी रुपयांचे दंड कमी होणार आहे.