
‘आरटीओ’तील कँटीनवर कारवाई
पुणे, ता. १९ ः आरटीओ कार्यालयासोबत करार संपलेला असताना देखील बेकायदा हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी अखेर गुरुवारी प्रशासनाने कारवाई करीत ते हॉटेल जमीनदोस्त केले आहे.
हॉटेल पाडल्यानंतर महसूल विभागाने ती जागा आरटीओ प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे. त्या ठिकाणी वाहन चालकांसाठी नवे सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. कारवाई वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच आरटीओचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
सरकारी निर्णयाप्रमाणे आरटीओ कार्यालयात झुणका भाकरी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र त्याचा करार संपून देखील बरीच वर्षे उलटून गेली. तरीही त्याचा व्यवसाय सुरूच होता.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या हॉटेलने कराराचे नूतनीकरण केलेले नव्हते. त्यामुळे गुरुवारी कारवाई करीत ती जागा आरटीओच्या ताब्यात देण्यात आली आहे. आरटीओ प्रशासन त्या जागेवर नागरिकांना सोयीचे ठरेल असे सुविधा केंद्र सुरू करेल.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे