
२३३ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेला सुरुवात
पुणे, ता. १९ : या वर्षी मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार ३० जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, एप्रिल महिन्यात अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. तहसीलदारांकडून गावाचे नकाशे अंतिम करणे, स्थळपाहणी करून प्रभागांच्या सीमा निश्चितीकरण, प्रारूप प्रभागरचनेची तपासणी, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी आणि त्यावर हरकती व सूचना मागविणे, प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सुनावणी आदी प्रक्रिया ३० जानेवारी ते ११ एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर १७ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. आयोगाकडून २५ एप्रिलला अंतिम प्रभागरचनेला मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ३०, बारामती ३२, भोर २७, दौंड ११, हवेली चार, इंदापूर सहा, जुन्नर २६, खेड २५, मावळ २०, मुळशी २३, पुरंदर १५, शिरूर आठ आणि वेल्हे सहा अशा एकूण २३३ मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती आहेत.