जुनं ते सोनं करण्याची किमया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनं ते सोनं करण्याची किमया
जुनं ते सोनं करण्याची किमया

जुनं ते सोनं करण्याची किमया

sakal_logo
By

तरुणाईच्या प्रेमाचे ‘टू स्ट्रोक’
पुण्यात जुन्या गाड्यांना सोन्याचा भाव;

दत्ता सावंत ः सकाळ वृत्तसेवा
datta.sawant@esakal.com
पुणे, ता. १७ ः तंत्रज्ञानाचा आधुनिक साज चढवलेल्या, काळाशी स्पर्धा करणाऱ्या दुचाकींची बाजारात रेलचेल असली तरी जुन्या टू स्ट्रोकच्या गाड्यांचा रुबाब काही औरच... ऐंशी-नव्वदच्या दशकातील तरुणांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या गाड्यांच्या प्रेमात पडलेली आजची तरुणाई तिला नव्या रूपात, नवा साज चढवून तिच्यावर स्वार होत आहे. त्यामुळे जुन्या गाड्या लाखमोलाच्या ठरू लागल्या आहेत. जुनं ते सोनं... ही उक्ती सार्थ ठरवण्यासाठी पुण्यातील ऑटोमोबाईल इंजिनिअर मंदार पानसे, ऑटोमोबाईल इंजिनिअर प्रदीप देवधर, मेकॅनिक मिलिंद आंग्रे यांच्यासह अनेक कारागीरांचे हात परीसाराखे काम करत आहेत. सध्या यामाहा आरएक्स हंड्रेड, रॉयल एन्फिल्ड, यझदी, सुझुकी या कंपन्यांच्या जुन्या टू स्ट्रोक गाड्यांची क्रेझ पुन्हा अवतरू लागली आहे. एवढंच नव्हे तर आजच्या तरुणाईच्या पसंतीला उतरतील, अशा स्वरूपात या गाड्यांचे रिलॉचिंगही होईल, अशी स्थिती आहे.

तरुणांमध्ये आवाजाची क्रेझ
कर्वेनगरमधील भालचंद्र ऑटोचे मालक आणि यामाहाचे मेकॅनिक मिलिंद आंग्रे यांनी सांगितले, ‘‘१९८५ ते १९९६ पर्यंत यामाहा कंपनीच्या टू स्ट्रोक आरएक्स-१०० मॉडेलची क्रेझ होती. बंदुकीच्या गोळीसारख्या, धावणाऱ्या, जोरदार पीक असलेल्या या गाडीच्या आवाजावरून (फायरिंग) व तिच्या ११ बीएचपी हायस्पीड ताकदीच्या इंजिनमुळे मागणी वाढत गेली. तिच्याकडे परवडणारी गाडी म्हणून पाहिले जायचे. सध्या याच गाड्यांवर तरुणाई फिदा होत आहे. या जुन्या गाड्यांसाठी ६५-७० हजार किंवा त्याहून जास्त रक्कम मोजली जात आहे. तिला नव्या रूपात अन् ढंगात आणण्यासाठी शौकिनांकडून हजारोंनी खिसा ढिला केला जातोय. दोन तपं मी या व्यवसायात आहे. पाच वर्षांपासून जुन्या गाड्यांची डागडुजी (रिस्टोरेशन) करून तिला नव्या साजशृंगाराने आकर्षक करण्याचा ट्रेंड आहे. आत्तापर्यंत पाचशेवर टू स्ट्रोक गाड्या रिस्टोअर केल्या आहेत.’’
जुन्याला नवं रूप देण्याबाबत आंग्रे म्हणाले, ‘‘वीस वर्षांपूर्वी टू स्ट्रोक गाड्या बंद झाल्या. मात्र त्यांचे इंजीन, आवाज, मजबूत बांधणी, सुटे भाग यामुळे मागणी वाढली आहे. यामाहाच्या या गाड्या आवाजासाठी प्रसिद्ध होत्या. तरुणांमध्ये रिस्टोरेशनबरोबर मोडिफिकेशनचीही क्रेझ आहे, त्यावर लागतील तेवढे पैसेही ते खर्च करतात. या गाड्यांची मूलभूत वैशिष्ट्ये जपत ही सर्व कामे करतो. १९ ते २५ या वयोगटातील तरुणांकडून या गाड्यांना मागणी आहे.’’

किंमती लाखाच्या घरात
ऑटोमोबाईल इंजिनिअर मंदार अरविंद पानसे यांनी जावा, यझदीबाबतच्या मोहिनीबाबत माहिती देताना सांगितले, ‘‘जावा, यझदीच्या सुरुवातीला १०० सीसीच्या गाड्या आल्या. टू स्ट्रोकमध्ये साधारण आठ मॅाडेल होती. सध्या या जुन्या गाड्यांना अधिक मागणी आहे. त्यांच्या किमती साधारण लाखाच्या आसपास आहेत. मॉडेलनुसार त्यांचे दर ठरतात. हाताशी क्लासिक, रोड किंग, सीएल-२, मोनार्क अशी मॉडेल असणे त्या काळी प्रतिष्ठेचे मानले जायचे. आजकालची मुलं जावा, यझदीच्या गाड्या लूक आणि आवाजासाठी खरेदी करतात. त्यांचे मूळ कारखाने तिकडचे होते, त्यामुळे चेन्नईमध्ये सुटे भाग सहज मिळतात. माझ्यासारख्या अनेक कारागिरांनी जुन्या गाड्यांचा स्टॉकच करून ठेवला आहे. अशांकडे ते पार्ट मिळतात. मात्र किंमतही तशीच मोजावी लागते. या गाड्या टकाटक करायला दीड लाखाच्या आसपास खर्च येतो. टू स्ट्रोक गाडीला ऑइल आणि पेट्रोल व्यवस्थित ठेवल्यास सौदा किफायतशीर ठरतो. मध्यमवयीन या गाड्या अधिक पसंत करतात.’’

माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये यझदीची बी मॅाडेल गाडी घेतली होती. ती आजही मी जपून ठेवली आहे. ती भारतातील पहिली डबल सायलेन्सरची दुचाकी होती. तिचा आवाज आजही कानात घुमतो. कीक, क्लच आणि गिअर एकाच ठिकाणी असल्याने चालवण्याची मजा काही औरच!
- राहुल मोकाशी, कोंढवे धावडे

माझ्या वडिलांकडे राजदूत होती. माझ्याकडेही १९८४ मधील यझदीची रोडकिंग आहे. या गाड्या रस्त्यावर चालताना वेगळेच आकर्षण असते. आम्ही नुकताच पुणे- गुजरात-अरुणाचल प्रदेश-पुणे असा आठ हजार ८०० किलोमीटरचा दौरा याच गाडीवरून यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्याची नोंद एशियन वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. हे सर्व याच गाडीमुळे शक्य झाले.
- राहुल हंकारे, वाकड

आरएक्स १०० टू स्ट्रोकचा आवाज बंदुकीच्या गोळीसारखा आहे. पिकअपही अफलातून. ही गाडी वजनाने हलकी आहे. यामाहाच्या गाड्यांचे इंजीन उत्तम असल्याने जगभरातून मागणी आहे. कमी मेंटेन्सस, उत्तम मायलेज, चालवायला सोपी, दिसायला स्पोर्टी असल्याने तरुणांमध्ये या गाडीची क्रेझ वाढत आहे.
- कुणाल देडगे, आयुष मोटार यामाहा, सिंहगड रस्ता


असा आहे खर्च
- जुनी गाडी खरेदीची किंमत- ७० हजार ते १ लाख
- नूतनीकरणाचा खर्च - १ ते १.५ लाख
- आरटीओचा नोंदणी खर्च - १५ हजार

या ब्रँड्सला मागणी
- यामाहा
- रॉयल एन्फिल्ड
- सुझुकी
- जावा
- यझदी

या गाड्यांना पसंती
यामाहा आरएक्स १००, यामाहा आरएक्स १३५, यामाहा आरएक्स ४ स्पीड, यामाहा आरएक्स ५ स्पीड, बुलेट, सामुराई, शोगन, शावलीन, क्लासिक, रोड किंग, बी मॅाडेल, सीएल -२, मोनार्क

या सुट्या भागांची क्रेझ
सायलेन्सर, मॅकव्हिल, स्पोक्स, इंडिकेटर, हेडलाइट, डिजिटल मीटर, सीट, कलर, प्लेटिंग

PNE23T19584