कात्रज-कोंढवा रस्ता दुरूस्तीसाठी अखेर जाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज-कोंढवा रस्ता दुरूस्तीसाठी अखेर जाग
कात्रज-कोंढवा रस्ता दुरूस्तीसाठी अखेर जाग

कात्रज-कोंढवा रस्ता दुरूस्तीसाठी अखेर जाग

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः भूसंपादनामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले. पण जो रस्ता सध्या अस्तित्वात आहे, त्याच्या दुरुस्तीकडेही पथ विभाग दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अखेर प्रशासनाला जाग आली आहे. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढणे, साइड पट्ट्यांमध्ये डांबरीकरण करून दोन्ही बाजूने रस्ता वाढविणे, दुभाजक टाकून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. ही कामे एका महिन्यात पूर्ण केली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सासवड रस्ता या भागातून येणारी अवजड वाहने कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळे या रस्त्यावर कायम अवजड वाहनांची वाहतूक असते. हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता ८४ मीटर रुंद करणार होते. चार वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले. पण जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. ८४ मीटरचा रस्ता करण्यासाठी भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. तेवढे पैसे महापालिकेकडे नाहीत, त्यामुळे ५० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत. ही प्रक्रिया होण्यास काही महिन्याचा कालावधी लागणार आहे.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्रवारी कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी केली. ज्या जागा ताब्यात आल्या आहेत, तेथून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्याचप्रमाणे सध्या जो अस्तित्वातील रस्ता आहे, तेथे खड्डे पडले आहेत किंवा तो भाग रस्त्याला समपातळीत नाही. त्यामुळे त्या जागेचा वापर होत नाही. या साइड पट्ट्यांचे काम केल्यास दोन्ही बाजूला किमान पाच ते सहा फुटाची अतिरिक्त जागा निर्माण होऊन कोंडी कमी होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याचे डांबरीकरणही करणार आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्ट्यांची जागा वाया जात आहे. तो भाग वापरातच येत नाही. त्यासाठी तेथे डांबरीकरण केल्यास रस्ता मोठा होईल. त्याचप्रमाणे सध्या कोणतीही गाडी कुठूनही वळत असल्याने अवजड वाहनांना अडथळा होत आहे. त्यातून वाहतूक कोंडी वाढते. हे टाळण्यासाठी रस्त्यामध्ये दुभाजक टाकले जातील. काही मोजक्याच ठिकाणी वळण्यासाठी जागा असतील.
- विकास ढाकणे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका