
पोटनिवडणुकांचा निर्णय मुंबईतील बैठकीत
पुणे, ता. २१ ः पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देऊ नये. ती निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीने लढविण्यात यावी, असा आग्रह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक येत्या २३ किंवा २४ जानेवारीला मुंबईत होणार आहे. या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.२१) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
साधारणतः आघाडीतील घटक पक्षांनी आपापली ताकद पाहून, ज्या पक्षाचे ताकद जास्त आहे, अशा पक्षाला पाठिंबा द्यायचा असतो. या सूत्रांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त करत, या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडल्या पाहिजेत, असे अप्रत्यक्ष संकेत अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पवार पुण्यात आले होते. या सभेनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. या दोन्ही आमदारांच्या निधनामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे मत व्यक्त केले.