सकाळ स्वास्थ्यम्‌मध्ये उलगडला गिर्यारोहकांचा प्रवास

सकाळ स्वास्थ्यम्‌मध्ये उलगडला गिर्यारोहकांचा प्रवास

फोटो: शहाजी जाधव : गिर्यारोहक प्रियांका मोहिते व आशिष माने यांच्याशी संवाद साधताना ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे.
.......
शिखरे आमच्यासाठी ध्यानकेंद्र
सकाळ स्वास्थ्यम्‌मध्ये उलगडला गिर्यारोहकांचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : शारीरिक व मानसिक स्वाथ्यासाठी गिर्यारोहण प्रभावी ठरत असताना देशातील पर्वत शिखरे ही आमच्यासाठी ध्यानकेंद्र अर्थात मेडिटेशन सेंटर आहेत. त्यांच्याशिवाय जीवन जगण्याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही, अशी भावना व्यक्त करत प्रसिद्ध गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या प्रियांका मोहिते आणि आशिष माने यांनी आपल्या ‘ट्रेकिंग’चे चित्तथरारक अनुभव पुणेकरांना सांगितले. ‘सकाळ स्वास्थ्यम’ या उपक्रमात रविवारी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी प्रियांका व आशिष यांची प्रकट मुलाखत घेतली. ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा होतो. या दिवसापासून छोट्या पर्वतांवर, गड किल्ल्यांवर गिर्यारोहण सुरु करण्याचे आवाहन झिरपे यांनी केले.

स्पर्धा स्वतःशीच
प्रियांकाने सांगितले की, मी मुळची साताऱ्याची आहे. माझे काका मला गडकिल्ल्यांवर फिरायला घेऊन जायचे. शिवाजी महाराजांचे किल्ले सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर केलेली कृष्णा पाटील २००९ मध्ये साताऱ्याला आली होती. तिची मुलाखत ऐकल्यानंतर माझ्या आई, वडिलांनाही वाटले की प्रियांकाही एव्हरेस्ट सर करू शकते. त्यानंतर कैलास बागल सरांच्या ग्रुपमधून तयारी सुरु केली. २०१३ मध्ये एव्हरेस्ट सर केले याचा मनस्वी आनंद झाला. आठ हजारपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर केली आहेत. कुठलेही शिखर सर करताना आपली स्पर्धा ही दुसऱ्याशी नव्हे तर स्वत:शी असते. त्यामुळे एखादे पाऊल मागे घेतले म्हणजे आपला पराभव होत नाही, तर सर्वाधिक उंची गाठण्याची ही तयारी असते. गिर्यारोहकांनी प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात करावी. पुढील दहा वर्षांत महिला गिर्यारोहकांची संख्या ५० टक्क्यांनी वाढेल असा विश्‍वासही वाटतो.

अशक्य काहीच नाही

साताऱ्यातच वाढलेला आशिष म्हणाला की, गावाकडे पोहणे, झाडांवरुन उड्या मारणे हेच खेळ होते. शनिवारी व रविवारी गडकिल्ल्यांवर जायचो. २००७ मध्ये पुण्यात आल्यानंतर मला गिर्यारोहण समजले. गिरीप्रेमी संस्थेच्या संपर्कात आलो. मोहिमेआधी एव्हरेस्टची नेमकी उंचीही माहीत नव्हती. प्रारंभी आईने विरोध केला, पण लवकरच तो मावळला. प्रत्येक मोहिमेत थरारक अनुभव आले. ‘डेथ झोन’मध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे फार महत्त्वाचे असते. अन्नपूर्णा शिखर सर करण्यापूर्वी दोन वर्षे शारीरिक मेहनत घेतली. सर्वाधिक उंचीचे शिखर सर केल्यानंतर सुरक्षितपणे उतरणेही तेवढेच महत्त्वाचे असते. आपल्याला या क्षेत्राची आवड असेल तर गिर्यारोहक होण्याचे स्वप्न बघावे. अशक्य काहीच नाही. फक्त जिंकण्याची जिद्द असेल तर तुम्हीही गिर्यारोहक होऊ शकता.
प्रारंभी सकाळचे मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ) महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते एव्हरेस्टवीर भूषण हर्षे याचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
-----
११ महिने काम, एक महिना मोहीम
प्रियांका सध्या बंगळूर येथील एका संस्थेत कर्करोगावर संशोधन करते. वर्षातील ११ महिने ती काम करते. एक महिना ती गिर्यारोहणासाठी देते. हीच ऊर्जा वर्षभर पुरते, अशी भावना तिने व्यक्त केली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com