विद्यार्थी संघटनांमध्ये राडा

विद्यार्थी संघटनांमध्ये राडा

पुणे, ता. ३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांत सदस्य नोंदणीवरून हाणामारी होते. गुरुवारी (ता. २) एसएफआय आणि समविचारी संघटनांच्या वतीने विद्यापीठाच्या आवारात निदर्शने करण्यात येते. तर शुक्रवारी विद्यापीठाच्या वसतिगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुपारी आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील आंदोलन संपल्यावर भाजयुमो आणि ‘अभाविप’चे कार्यकर्ते परत येत असताना मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. रिफेक्ट्रीसमोर ‘नव समाजवादी पर्याय’ या संघटनेचे सदस्य नोंदणी करणारे कार्यकर्ते दिसल्यावर आंदोलक त्यांच्यावर धावून गेले. त्यांनी सदस्य नोंदणी रोखली. यावेळी पोलिसांनी संरक्षक कडे करून ‘नव समाजवादी पर्याय’ या संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना संरक्षण दिले. दोन्ही संघटना एकमेकांना भिडल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांची धरपकड सुरू केली आणि ताब्यात घेतले. तसेच इतर आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तब्बल तासभर विद्यापीठ परिसरात हा राडा सुरू होता. मात्र, सर्वांना शांत करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले.

आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी गुन्हा
विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. आजच्या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून आवारात प्रवेश करण्याबाबत बंधने आणली आहेत.
कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात, ‘‘काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही व्यक्ती सदर मजकूर समाज माध्यमातून प्रसारित करून त्यास प्रसिद्धी देऊन या कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या सर्व संबंधितांविरुद्ध चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.’’ विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करीत आहे. विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे. सदर प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात येत आहे की विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

प्रवेशासाठी कडक निर्बंध
- विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत असून सर्व प्रवेशद्वारांवर बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित
- मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी नोंदणी करून प्रवेश देण्यात येईल
- सर्व वसतिगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवासी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिकद्वारे प्रवेश देण्यात येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com