टेकडीफोड,
बकालपणा,
जलस्रोत नष्ट!

टेकडीफोड, बकालपणा, जलस्रोत नष्ट!

नितीन बिबवे
बिबवेवाडी, ता. १० : शहराच्या इतिहासात दक्षिण उपनगरामध्ये मुंजेरीच्या निसर्गरम्य टेकड्या म्हणून बिबवेवाडीतील टेकड्यांची ओळख होती. कालांतराने वाढत्या शहरीकरणामुळे टेकड्या गायब झाल्याचे दिसते. डोंगर माथा, डोंगर उतार व जैवविविधता आरक्षणे असल्यामुळे काही प्रमाणात टेकड्यांचे अस्तित्व टिकल्याचे दिसते. परंतु, टेकड्यांलगत काही भाग रहिवासी भाग असल्यामुळे तेथे टेकड्या पोखरलेल्या आहेत. त्यामुळे टेकड्यांचे मूळचे सौंदर्य लोप पावले असून वाढत्या नागरीकरणामुळे बकालपणा आला आहे. टेकडीफोड झाल्यामुळे लगतचे ओढे, नाले, पाण्याचे जिवंत झरे नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाले आहेत. त्याचा थेट फटका काही गृहप्रकल्पांना बसतो. त्या गृहप्रकल्पांमध्ये झऱ्‍याचे पाणी येत असल्याचे दिसते.

काय आहे स्थिती
- टेकड्यांलगत मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत.
- त्यासाठी लगतच्या भागात टेकडी फोडून निघालेला राडारोडा, मुरूम, दगडांची तयार झालेली कृत्रिम टेकडी आहे
- मुसळधार पावसात कृत्रिम टेकडीचा राडारोडा, मुरूम, दगडी वाहून अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे
- उपनगरांच्या मध्यावर टेकड्या असल्यामुळे आरक्षणे असूनसुद्धा अनधिकृत बांधकामे झाली आहेत
- मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात टेकड्या फोडलेल्या आहे
- त्यामुळे शेजारील गृहप्रकल्प, बांधकामांना दरडी पडण्याचा धोका
- दरवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडतात

अस्तीत्त्वाच्या खुणा
काही टेकड्या लष्कराकडे येतात, तर काही खासगी संस्थेच्या जागा आहे. टेकड्यांवरील त्या भागात झाडी असून जैवविविधता, मोर, पोपट अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या वावर टिकून आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या नागरीकरणामध्ये टेकड्यांचा काही भाग शाबूत राहिलेला आहे. अशा ठिकाणी देवराई करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण व जैवविविधता टिकून राहील.
- दिलीप मेहता, अध्यक्ष, पुणे सिटीजन फोरम

टेकडी फोड सुरू असलेल्या ठिकाणची माहिती महसूल विभागाकडे दिली जाते. त्यानुसार महसूल विभाग कारवाई करते. टेकडीवर व परिसरात झाडे लावण्याचा उपक्रम राबवला जातो.
- प्रकाश पवार, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com