भावनिक तोल सांभाळूया!

भावनिक तोल सांभाळूया!

पुण्यातील सारिका चांडक या मानस तज्ज्ञ असून महिलांना भावनिक गुंतागुंतीबाबत सजग करणे, ही त्यांना काळाची गरज वाटते. महाराष्ट्र सरकारच्या मानसिक आरोग्य समीक्षा मंडळ, पुणे विभागाच्या सदस्य व पुनर्वसन समुपदेशक
म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
चांडक म्हणाल्या, ‘‘भावनिक आंदोलने महिलांमध्ये अधिक दिसून येतात. कारण घरीदारी सभोवतालच्यांनी त्यांच्यावर लादलेल्या अपेक्षांचा भार तर त्यांच्यावर असतोच. शिवाय आपणहूनही विविध प्रकारच्या अपेक्षा त्या स्वतःकडून करत असतात. हे सारे स्त्रियांनी इतरांच्या सेवेसाठी कायम सज्ज असण्याच्या सामाजिक दडपणातून घडते. आपल्यासाठी थोडासा वेळ देण्यातही त्यांना अपराधी वाटते. यामुळे आतल्या आत त्यांची सतत घुसमट होते. मासिकपाळी, गरोदर अवस्था, बाळंतपण व रजोनिवृत्तीच्या काळात निरनिराळ्या संप्रेरकांमुळेही त्यांच्यात भावनिक चढउतार दिसून येतात. त्यांचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. त्यांना हे समजत नाही व घरचे समजून घेत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांमध्ये स्वतःबद्दल जागरूकता आणण्याची गरज आहे.’’

काही निरीक्षणे
- काही महिला कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आदींना बळी पडल्या असतील तर त्यांना तीव्र भावनिक धक्का बसतो.
- त्याने त्या खचून जाणे स्वाभाविक आहे.
- यातून काही वेळा भावनिक असंतुलनाला त्या बळी पडू शकतात.
- त्यांच्यासाठी जवळच्या नात्यातील व्यक्ती किंवा मैत्रिणींनी मदतीचा हात पुढे करायला हवा.
- नुसतेच निराशाजनक बोलून तिला घाबरवण्यापेक्षा आशेचा किरण दाखवणारे विधायक पर्याय
सुचवता आले पाहिजेत.
- स्त्रिया आपणहून सहसा व्यक्त होत नाहीत. यामुळे मनात भावनांचा कोंडमारा होऊन मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात.
- या ऐवजी तिने भावनांचा निचरा करण्यासाठी जवळच्या व्यक्तींपुढे मन मोकळे केले पाहिजे. समविचारी मैत्रिणींशी त्याबद्दल बोलायला हवे.


आपल्या क्षमता व कमतरता लक्षात घेऊन, त्यानुसार उद्दिष्टे स्वीकारावीत. म्हणजे अपेक्षाभंगाचे दु:ख टळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शारीरिक स्वास्थ्य उत्तम असले तर मनाचेही स्वास्थ चांगले राहते. इतरांच्या व आपल्याही आपल्याबद्दलच्या अपेक्षा वास्तववादी असाव्यात. ताणतणाव कमी करण्यासाठी छंद जोपासावेत. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.
- सारिका चांडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com