संतविचार मूल्यशिक्षणाचे मूलद्रव्य

संतविचार मूल्यशिक्षणाचे मूलद्रव्य

पुणे, ता. १० ः महाराष्ट्रातील भागवतधर्मी संतमंडळाने प्रसृत करून ठेवलेले विचारधन हे तर मूल्यशिक्षणाचे मूलद्रव्य असून संस्कारक्षम वयातच संतप्रणीत मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटवण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये संतविचारांचा समावेश जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये केले.
पुण्यातील श्री गंधर्ववेद प्रकाशनाने आयोजित केलेल्या ‘समन्वय संत शेख महंमदमहाराज यांची अमृत अगवाणी’ आणि ‘संत एकनाथमहाराज यांचा सार्थ हरिपाठ’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. किंबहुना, शालेय जीवनामध्येच संतविचारांतील मानवी जीवनविषयक शिकवण दृढ होण्याच्या दृष्टीने श्री गंध-वेद प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथासारखे दर्जेदार वाचनसाहित्य राज्याच्या कानाकोपऱ्यांत पोचविण्यासाठी शासकीय ग्रंथालयांच्या संस्थात्मक यंत्रणेचे पाठबळ अशा प्रयत्नांच्या पाठीशी उभे केले जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी लोकव्यवहाराचे व्यासंगी अभ्यासक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संतांच्या जीवनकार्याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये आता उदंड प्रमाणावर जागृती होत असलेल्या जिज्ञासेला अभ्यासाची जोड पुरविण्याच्या दृष्टीने संतांच्या साहित्याचे संशोधकीय शिस्तीने परंतु रसाळ अशा वाचनीय शैलीमध्ये विवरण करणाऱ्या ग्रंथांची आज घडीला नितांत आवश्यकता असल्याचे आफळे यांनी सांगितले.
समन्वय संत शेख महंमदमहाराज यांची अमृत अभंगवाणी या ग्रंथाचे लेखक डॉ. अनिल सहस्रबुद्धे आणि संत एकनाथमहाराज यांचा सार्थ हरिपाठ या ग्रंथाचे लेखक डॉ. मुकुंद दातार यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आला. श्री गंधर्व-वेद प्रकाशनाचे दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक केले. अभय टिळक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे ः ग्रंथांच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) अभय टिळक, सदानंद मोरे, चारुदत्त आफळे, दीपक खाडीलकर, चंद्रकांत पाटील, मुकुंद दातार व अनिल सहस्त्रबुद्धे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com