दुखतंय डोकं बायकोचं 
दुखणं वाढलं नवऱ्याचं!

दुखतंय डोकं बायकोचं दुखणं वाढलं नवऱ्याचं!

‘‘अहो, माझं डोकं खूप दुखतंय.’’ डोकं धरत अंजलीने म्हटले.
‘‘तुला डोकं आहे की नाही, असं मी मघाशी गमतीने म्हटले होते. लगेचच त्याचा पुरावा द्यायची गरज नाही. कशामुळं दुखतंय डोकं?’’ मुकेशने विचारले. ‘‘तुमच्या रोजच्या कटकटीनेच माझं डोकं दुखतंय.’’ त्रागा करीत अंजलीने म्हटले. ‘‘अगं नुसत्या कटकटीने डोकं दुखत असतं, तर मला बारा महिने चोवीस तास कपाळाला पट्टी बांधून हिंडावं लागलं असतं. शिवाय रोज बाम लावण्यासाठी एक माणूस पगारी ठेवावा लागला असता.’’ मुकेशने हसत म्हटले.
‘‘खरं तर तुम्हाला ‘टोमणेबहाद्दर’ किंवा ‘शेर-ए-टोमणे’ हा पुरस्कारच दिला पाहिजे. बायकोचं डोकं दुखतंय, ते चेपून द्यावं हे राहिलं बाजूला तर आणखी डोकं कसं दुखेल, हेच बघताय.’’ अंजलीने रागाने म्हटले. ‘‘सारॉ. मी गंमत केली. डोकं दुखत असलेल्या अवस्थेत तू इतकी सुंदर दिसत आहेस की ऐश्वर्या रायदेखील तुझ्यापुढे फिकी पडेल. असं वाटतं, कायम तुझं डोकं दुखावं.’’ मुकेशने म्हटलं. त्यावर अंजली म्हणाली, ‘‘माझं डोकं दुखू लागल्यावर मी तुमच्यामागे कटकट करीत नाही ना, म्हणून तुम्ही असं म्हणताय हे कळतंय मला पण त्यासाठी माझी का डोकेदुखी वाढवताय?’’ अंजलीने म्हटले. त्यावर मुकेश म्हणाला, ‘‘आता तू काही बोलू नकोस. आराम कर.’’ असं म्हणून तो तिला हाताला धरून बेडरुममध्ये घेऊन गेला. तिच्या कपाळावर बाम लावला. ‘‘मस्तपैकी आराम कर. मी घरातली सगळी कामं करतो.’’ असे म्हणून मुकेश हॉलमध्ये आला व मोबाईलवर टाइमपास करत बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुकेशने अंजलीला विचारलं. ‘‘काय गं डोकं कमी आहे का? बाम लावून देऊ?’’ नवऱ्याचं आपल्यावरील प्रेम पाहून अंजली भारावून गेली. आपण समजतो तेवढा आपला नवरा कुजक्या स्वभावाचा नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे...तिने मनात म्हटलं. मुकेशने परत तिच्या कपाळाला बाम लावला. परत तासाभराने मुकेश तिच्याजवळ आला. ‘‘काय गं डोकं कमी आहे का?’’ त्याने प्रेमाने विचारले. ‘‘हो. आता कमी आहे.’’ अंजलीने हसत म्हटले. मुकेशने तिला बेडवर चहा आणून दिला. त्यानंतर तासाभरानं परत तो तिच्याजवळ आला. ‘‘काय गं डोकं कमी आहे का?’’ त्याने कपाळाला हात लावत विचारलं. ‘‘हो. डोकं आता कमी आहे. आता दुखत नाही.’’ अंजलीने हसत म्हटले. परत तासाभराने मुकेशने तिला विचारलं, ‘‘काय गं डोकं कमी आहे ना?’’ त्यावर अंजली म्हणाली. ‘‘हो कमी आहे पण तुम्ही सारखंच का विचारताय?’’ तिने शंका घेत विचारलं. ‘‘अगं तुझं डोकं दुखत असताना, डोकं कमी आहे का? असं विचारण्याची संधी मला अनायसे मिळत असते. इतरवेळी विचारलं असतं तर तू आकाशपाताळ एक केलं असतंस आणि मला धारेवर धरलं असतंस. पण यावेळी तू तसं काही करत नाहीस उलट ‘डोकं कमी आहे’ असंही तू कबूल करतेस. या दोन्ही गोष्टींचा मला खूप आनंद होतो. त्यामुळे परत परत आनंद घेता घ्यावा म्हणून मी तुला दर तासाने ‘डोकं कमी आहे का?’ असं विचारतोय.’’ मुकेशचं बोलणं ऐकून अंजलीने मुकेशच्या दिशेने लाटणं भिरकावलं. सध्या मुकेश डोक्याला बॅंडेज लावून हिंडतोय व अंजली त्याला अधूनमधून विचारतेय ‘‘डोकं ताळ्यावर आलंय का?’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com