कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे भूजल व्यवस्थापन

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे भूजल व्यवस्थापन

पुणे, ता. २२ : भूजलाचा ऱ्हास होऊ नये म्हणून धोरणात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग भूजलाच्या वापरकर्त्यांना पीक-पाणी नियोजन, भूजल गुणवत्ता राखणे, नवीन विहिरी व बोअरवेल घेण्यासाठी होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून भूजल विभागाने मॅपिंग करणे, डेटा डिजिटायझेशन व निर्णय आधार प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु केले आहे, अशी माहिती राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.
राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई आणि विश्वकर्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील भूजल भवनात केले होते.
एकीकडे वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, भूजलाचे प्रदूषण, सततचे बदलते भूभाग यांमुळे भूजलावर होणारा परिणाम व यासोबतच बदलणारे पर्जन्यमान व कठीण पाषाणाची भूरूपीय संरचना या सर्व बाबींमुळे भूजलाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक झालेले आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र अध्ययनाचा वापर करून उपयुक्त प्रणाली जसे की भूजल पातळीचा अंदाज, भूजल गुणवत्तेचे अनुमान, पर्जन्यमान व पुनर्भरणचा परस्पर संबंध इ. उपक्रम हाती घेण्याबाबत कार्यशाळेत चर्चा झाली.
या कार्यशाळेत भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. डी. धुमाळ हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. डॉ. विजय वाघमोडे, डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या पूर्वार्धात आयआयटी, मुंबई येथील प्रा. इंदू यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे भूजलामध्ये केलेल्या पथदर्शी प्रकल्पांबाबत दूरस्थ पद्धतीने सादरीकरण केले. डॉ. सेन यांनी भूजलाविषयी विविध माहितीच्या संस्करणाबाबत व्याख्यान दिले. प्रा. श्रीनिवास लोंढे यांनी जलसंसाधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर विस्तृत सादरीकरण केले. प्रा. महाले यांनी डेटा इंजिनिअरिंग फॉर कॅपिटलबाबत तर डॉ. प्रज्ञा दीक्षित आणि डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी प्रेडिक्टिव्ह मॉडेलबाबत सादरीकरण केले. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या उपसंचालिका भाग्यश्री मग्गीरवार यांनी प्रास्ताविक तर डॉ. प्रज्ञा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भूजलाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी करून सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यासाठी भूजल विभागाने इतिहासात प्रथमच पाऊले उचलले आहे.
- चिंतामणी जोशी,
भूजल आयुक्त, महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com