नव्या शैक्षणिक वर्षात मिळणार कुलगुरू?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : मेच्या तिसऱ्या आठवड्यात होणार मुलाखत

नव्या शैक्षणिक वर्षात मिळणार कुलगुरू? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : मेच्या तिसऱ्या आठवड्यात होणार मुलाखत

पुणे, ता. २९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींना कुलगुरू निवड समितीकडून मुलाखत आणि संवादासाठी निवड झाल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. यात निवड झालेल्या व्यक्तींना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे येत्या नवे शैक्षणिक वर्ष (२०२३-२४) सुरू होताच; म्हणजेच जूनमध्ये विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची चिन्हे आहेत.

तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे अतिरिक्त कुलगुरुपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर जानेवारी २०२३ मध्ये राज्यपालांकडून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती जाहीर करण्यात आली. यात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर (विद्यापीठ अनुदान आयोग प्रतिनिधी) यांना विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीचे सदस्य म्हणून निवडण्यात आले.

या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत दिली होती. यापदासाठी जवळपास ९० अर्ज आले होते. त्यापैकी काही निवड व्यक्तींना पहिल्या टप्प्यातील मुलाखत आणि संवादासाठी १८ आणि १९ मे दरम्यान मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी, पवई) निमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भातील निवडपत्रे संबंधितांना पाठविण्यात आलेली आहेत.

कुलगुरुपदासाठी होणाऱ्या मुलाखत व संवादातून निवड समितीमार्फत पाच नावे निवडण्यात येतील. त्यानंतर या पाच नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल. यातून राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती हे कुलगुरूंच्या नावाची घोषणा करतील. त्यामुळे जवळपास जूनमध्ये विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेत विद्यापीठातील प्राध्यापकच आघाडीवर असल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com