सर्वपक्षीय सत्तेचा ‘नवा पुणे  पॅटर्न’

सर्वपक्षीय सत्तेचा ‘नवा पुणे पॅटर्न’

गजेंद्र बडे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेपासून राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्याच काही नाराज नेत्यांनी बंड करत, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी जुळवून घेतले आणि सर्वपक्षीय सत्ता आणण्यात यशही मिळविले. त्यामुळे या बाजार समितीवर भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (बंडखोर) अशी सर्वपक्षीय सत्ता आली आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीचा सर्वपक्षीय ‘नवा पुणे पॅटर्न’ उदयास आला आहे. या पॅटर्नमुळे खिचडी सत्ता स्थापन होणार आहे. ती पाच वर्षे टिकविण्यात हा पॅटर्न यशस्वी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पुणे शहरातच जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान भाजप नेते जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यात १० जून १९९९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच पूर्वाश्रमीची हवेली आणि आताची पुणे बाजार समिती ही त्यावेळी राष्ट्रवादीने एकहाती ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादीच्या संचालकांचा कार्यकाळ संपला आणि तेव्हापासून या ना त्या कारणाने या बाजार समितीवर सलग दोन दशके प्रशासकराज राहिले. दोन वर्षांच्या खंडानंतर मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारले असून सर्वपक्षीयांना पसंती दिली आहे.
तसं पाहिलं तर, पुणे कृषी बाजार समितीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला कौल दिलेला नाही. या निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल उतरले होते. या तीनही पॅनेलला मतदारांनी थोड्या-थोड्या का होईना जागांवर कौल दिला आहे. यानुसार भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलला १३, राष्ट्रवादीच्या पॅनेलला दोन आणि तिसऱ्या पॅनेलला तीन जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, या निकालाने पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची मोठी नाचक्की झाली आहे. कारण, या पक्षाच्या पॅनेलमधील दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभूत झालेल्या दिग्गजांमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या पत्नी सरला चांदेरे, नवनाथ पारगे, सहदेव म्हस्के आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलचे नेतृत्व हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच नेते असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि याच निवडणुकीच्या कारणावरून राष्ट्रवादीमधून नुकतीच हकालपट्टी केलेले विकास दांगट यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या पराभवासाठी पूर्वाश्रमीचे याच पक्षाचे दोन नेते कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. प्रदीप कंद आणि विकास दांगट हे दोघेही याआधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. कंद हे भाजपच्या अधिकृत उमेदवारीवर तर, विकास दांगट हे अपक्ष म्हणून जिल्हा बॅंकेवर विजयी झाले आहेत. याच दोन नेत्यांनी जिल्हा बॅंकेनंतर आता पुणे बाजार समितीतही राष्ट्रवादीला मोठी धोबीपछाड केले आहे. दरम्यान, या निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून विकास दांगट यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com