अष्टविनायक यात्रा आता एका दिवसात

अष्टविनायक यात्रा आता एका दिवसात

पुणे, ता. २ : अष्टविनायकाची यात्रा आता २४ तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. ही सर्व स्थळे एकमेकांना जोडणाऱ्या २५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अष्टविनायक एक आहे. अष्टविनायकाची ही स्वयंभू गणपतींची आठ मंदिरे प्रेक्षणीय असून राज्यासह परराज्यातून तसेच देश-विदेशातून येणाऱ्‍या भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. परंतु, अष्टविनायकाच्या दर्शनादरम्यान मार्गांवरील अडथळ्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांचा हा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने अष्टविनायकांच्या स्थळांना जोडणाऱ्‍या २५२ किमी रस्त्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे.
मोरेश्‍वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर) गिरिजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्‍वर (ओझर) आणि महागणपती (रांजणगाव) ही पाच गणपतींची मंदिरे पुणे जिल्ह्यात असून सिद्धेश्‍वर (सिद्धटेक) नगर जिल्ह्यात, तर बल्लाळेश्‍वर (पाली) आणि वरदविनायक (महाड) ही दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आहे. हा संपूर्ण मार्ग ६५४ किमीचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीत येणाऱ्या महामार्गात सुधारणा सुरू असताना पीडब्ल्यूडीने या मार्गावरील २५२ किमीचे जाळे जोडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अष्टविनायक दर्शनासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत असताना आता २४ तासात आणि जलदगतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

अष्टविनायकांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी आणि प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन सर्व मंदिरांचे मार्ग जोडण्यास सुरवात केली आहे. यामध्ये २५२ किमी लांबीच्या रस्त्यांचा विकास करून ते एकमेकांना जोडणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये या कामाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ९०० कोटी रुपये खर्च येणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे खासगी कंपनीला हे काम दिले असून मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण आदी कामे करण्यात येत आहेत.
- अतुल चव्हाण,
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

अष्टविनायकाच्या सर्व मंदिरांचे मार्ग जोडण्यास सुरवात केली असल्याने भाविकांचा प्रवास सोपा होणार आहे. विशेष म्हणजे एका दिवसात प्रवास पूर्ण होणार असल्याने वेळेत बचत होईल. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
- तात्यासाहेब लोणकर, भाविक


६५४ किमी
- अष्टविनायक यात्रेचा मार्ग

२५२ किमी
- रस्ते एकमेकांना जोडणार

९०० कोटी रुपये
- किती खर्च येणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com