रेहमान यांचा कार्यक्रम पोलिसांकडून बंद
उशीर झाल्याचे कारण; न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा

रेहमान यांचा कार्यक्रम पोलिसांकडून बंद उशीर झाल्याचे कारण; न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा

पुणे, ता. २ : प्रसिद्ध संगीतकार व ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांच्या संगीत रजनीस रात्री दहा वाजल्यानंतर काही मिनीटे उशीर झाला. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने थेट स्टेजवर चढून रेहमान यांचे गाणे थांबवित कार्यक्रम बंद केला. या प्रकारामुळे रेहमान यांनी कार्यक्रम सोडून तेथून निघून जाणे पसंत केले. एकीकडे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा केला, तर दुसरीकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवण्याची भूमिका घेतली.

संगीतकार ए. आर. रेहमान यांचा रविवारी रात्री पुणे स्टेशजवळील राजा बहादूर मिल मैदान परिसरात सांगितिक कार्यक्रम (लाइव्ह कॉन्सर्ट) सुरू होता. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास बंदी आहे. दरम्यान, रेहमान यांचा कार्यक्रम रंगात आला होता. रेहमान हे स्वतः ‘चल छैय्या छैय्या’ हे लोकप्रिय हिंदी गीत सादर करीत होते. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात होता. १० वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरू होतो. बंडगार्डन पोलिसांकडून कार्यक्रमाच्या आयोजकांना कार्यक्रम वेळेत संपविण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, आयोजकांनी वेळेची मर्यादा ओलांडल्याने आणि सूचना देऊनही त्यांचे पालन न केल्याने बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील हे स्वतः स्टेजवर गेले. त्यांनी काही वादकांना त्यांचे वादन थांबविण्यास सांगितले. त्याचवेळी रेहमान हे गाणे गात होते. पाटील यांनी त्यांच्या दिशेने हातवारे करून कार्यक्रम तत्काळ बंद करा, असे सांगितले. पोलिस अधिकारी अचानक स्टेजवर आल्यामुळे कलाकारांसह प्रेक्षकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला. कार्यक्रम बंद करण्याच्या पद्धतीवरून कलाकार, प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

न्यायाल्याच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास बंदी आहे. संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना १० वाजता कार्यक्रम संपवावा, अशा सूचना अगोदर दिल्या होत्या. सूचना दिल्यानंतर रात्री १० वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे आमच्या पोलिस अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम बंद करून न्यायालयाच्या नियमांचे पालन केले. कायद्यासमोर सर्व समान आहेत.
- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

कारवाईची अशीच तत्परता दाखवणार का?
पोलिसांकडून रेहमान यांचा चालू कार्यक्रम बंद पाडण्याची मर्दुमकी पोलिसांनी गाजवली. आता कारवाईची हीच तत्परता शहरात सुरू असलेल्या पब, हॉटेल, बारवर कारवाई करून दाखविणार का? शहरातील अन्य मोठ्या सांगितिक कार्यक्रमांनाही उशीर होतो, ते कार्यक्रम बंद पाडण्याचे धाडस पोलिसांत आहे का? अशा तिखट प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.

कारवाईची दुसरीही पद्धत असते!
शहरात अनेक मोठे उत्सव, सण, सांगितिक महोत्सव होतात. तेथेही अनेकदा कार्यक्रमांच्या नियोजित वेळेत काही मिनीटे उशीर होतो. तेव्हा पोलिसांकडून आयोजकांना बोलावून समज दिली जाते. त्यानंतरही न ऐकल्यास कार्यक्रम पूर्ण होऊ दिला जातो. त्यानंतर संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र स्टेजवर चढून थेट कलाकारालाच कार्यक्रम थांबविण्यास सांगण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com