रेहमान यांचा कार्यक्रम पोलिसांकडून बंद 
उशीर झाल्याचे कारण; समाजमाध्यमांवर रंगल्या उलटसुलट चर्चा

रेहमान यांचा कार्यक्रम पोलिसांकडून बंद उशीर झाल्याचे कारण; समाजमाध्यमांवर रंगल्या उलटसुलट चर्चा

पुणे, ता. १ : प्रसिद्ध संगीतकार व ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांचा सांगितिक कार्यक्रम रात्री दहा वाजल्यानंतरही सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत तो बंद पाडला. रेहमान यांनी पोलिसांच्या सूचनांचा मान राखत कार्यक्रम बंद करून तेथून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, यावरून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा रंगल्या.

पुणे स्टेशनजवळील राजा बहादूर मिल परिसरातील मैदानामध्ये संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या संगीत रजनीचे (लाइव्ह कॉन्सर्ट) रविवारी आयोजन करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री १० वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास बंदी आहे. दरम्यान, रेहमान हे स्वतः ‘चल छैय्या छैय्या’ हे लोकप्रिय हिंदी गीत सादर करीत होते. वेळेच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याबाबत पोलिसांकडून आयोजकांना सूचना दिल्या जात होत्या. १०.१५ वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरू होता. अखेर बंडगार्डन पोलिसांनी यामध्ये कार्यक्रमात हस्तक्षेप केला. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी १०.१५ वाजण्याच्या सुमारास स्वतः स्टेजवर जाऊन वादकांना त्यांचे वादन थांबविण्यास सांगितले. तसेच रेहमान यांच्या दिशेने हातवारे करीत कार्यक्रम तत्काळ थांबवा, असे सांगितले. रेहमान यांनी त्यांच्या सूचनेचे पालन करून कार्यक्रम थांबविला. तसेच ‘धन्यवाद पुणेकर, धन्यवाद पुणे पोलिस’ अशा शब्दांत आभार मानले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडला. यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला, तर कार्यक्रम बंद करण्याच्या पद्धतीवरून कलाकार, प्रेक्षकांसह समाजमाध्यमांवर उलटसुलट चर्चा रंगली.

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास बंदी आहे. संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांना १० वाजता कार्यक्रम संपवावा, अशा सूचना अगोदर दिल्या होत्या. सूचना दिल्यानंतर रात्री १० वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे आमच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तो बंद करून न्यायालयाच्या नियमांचे पालन केले. कायद्यासमोर सर्व समान आहेत.
- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

‘रॉकस्टार क्षण तुम्ही अनुभवला का?’
दरम्यान, ‘‘काल आपण सर्वांनी स्टेजवर ‘रॉकस्टार’ क्षण अनुभवला का? आम्ही तो क्षण अनुभवला. तुम्ही दिलेल्या उदंड प्रेम व उत्साहाबद्दल धन्यवाद. शास्त्रीय संगीताचे माहेरघर म्हणजे पुणे. आम्ही लवकरच तुमच्यासोबत गाण्यासाठी परत येऊ,’’ असे ट्विट यानंतर रेहमान यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com