पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

Published on

पुणे, ६ ः दोन आठवड्यांपासून दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे शहरात पावसाला सुरुवात झाली खरी. मात्र, अद्यापही पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दिवसभर ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, असे चित्र शहरात सध्या अनुभवायला मिळत आहे. नाही म्हटले तरी यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळपासून ढगाळ असलेले आकाश दुपारी मात्र निवळले होते. संध्याकाळी पुन्हा एकदा ढगाळ हवामान आणि अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. संध्याकाळपर्यंत शहरात सरासरी एक मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोकणात जोरदार पावसाचे संकेत
राज्यातही कोकणासह, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सूनचा आस..
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, मंडला, अंबिकापूर, बालासोर ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र टिकून आहे. पश्‍चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.