पुणेकरांना पाणीकपात रद्दची प्रतीक्षा

पुणेकरांना पाणीकपात रद्दची प्रतीक्षा

Published on

पुणे, ता. ९ ः पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे, तर खडकवासला धरणात ५० टक्के पाणीसाठा आहे; मात्र खडकवासला धरण १०० टक्के भरून धरणाची दारे उघडल्याशिवाय पुणे शहराची पाणीकपात मागे घेतली जाणार नाही. त्यामुळे आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एलनिनो प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा वापर जपून करावा, यासाठी राज्य सरकारने पुणे महापालिकेला सूचना दिल्या होत्या. तसेच धरणातील पाणी ३१ ऑगस्टपर्यंत वापरता यावे, या दृष्टीने नियोजन करण्यासही सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने पाणी गळीत थांबविण्यासह पाणीकपातीचा निर्णय घेतला. १८ मे पासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामधून किमान ०.२५ टीएमसी पाणी बचत होऊ शकते.
दर गुरवारी पाणी बंद ठेवल्याने शुक्रवारी, शनिवारी सुमारे २० टक्के भागाला अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीही येत आहेत. जलवाहिनीतील हवेचा दाब काढून टाकण्यासाठी १५० पेक्षा जास्त एअर वॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी आहे. जुलै महिन्यात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरीही अद्याप अशा पावसाची प्रतीक्षा आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत ७.२६ टीएमसी म्हणजे २४.८९ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. खडकवासला धरणात ०.९९ टीएमसी म्हणजे ४९.९७ टक्के पाणी जमा झाले आहे. धरण १०० टक्के भरल्यानंतर दर गुरुवारची पाणी कपात मागे घेतली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘पाणी कपात मागे घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.