पुणे जिल्ह्यात टँकरच्या 
पाण्यावर चार कोटींचा खर्च

पुणे जिल्ह्यात टँकरच्या पाण्यावर चार कोटींचा खर्च

Published on

पुणे, ता. ८ : पुणे जिल्ह्यातील गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर अवघ्या दोन महिन्यात चार कोटी एक लाख ९४ हजार २०० रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या खर्च झालेल्या एकूण निधीपैकी सर्वाधिक तीन कोटी ४६ लाख ६४ हजार रुपयांचा खर्च हा खासगी टॅंकरवर झाला आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा काळ लोटला असला, तरी जिल्ह्यातील ४४ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दोन दिवसांत टँकरची संख्या १२ने कमी झाली आहे. जिल्ह्यात ५ जुलै २०२३ रोजी ४४ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. ही संख्या ७ जुलै २०२३ रोजी ३२ झाली आहे. ५ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५८ गावे २५० वाड्यांना ४४ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. सद्यःस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७८ हजार २०९ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे. मात्र गत वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. गतवर्षी आजअखेरपर्यंत (ता. ८ जुलै २०२२) ६६ टॅँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून शनिवारी (ता. ८) सांगण्यात आले.
दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात खूप उशिराने टँकर सुरू करावे लागले आहेत. जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ दहा टँकर सुरु झाले होते. जून महिना हा पाऊस सुरु होण्याचा महिना असतो. त्यामुळे जूनमध्ये पाऊस पडला की, टँकर्सची संख्या कमी होत असते. परंतु यंदा याउलट चित्र पाहायला मिळत आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर टॅँकर्सच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ऐन जून महिन्यात जिल्ह्यातील टँकर्सची संख्या वाढून ती आता ४४ वर गेली होती.

सध्या चारच तालुक्यात टँकर सुरू
सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील १३पैकी नऊ तालुके टँकरमुक्त झाले आहेत. सध्या उर्वरित चार तालुक्यात हे ३२ टँकर्स सुरु आहेत. सध्या टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यांमध्ये यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड आणि पुरंदर या चार तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक १२ टॅंकर्स हे आंबेगाव तालुक्यात सुरू आहेत. या तालुक्यातील १७ गावांमधील २६ हजार ४२१ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील टँकरमुक्त तालुके
बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, भोर आणि वेल्हे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.