नाट्य संमेलनाच्या नियोजनाचा ‘मुहूर्त’ परिषदेतर्फे नियोजनाला प्रारंभ; नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आयोजन

नाट्य संमेलनाच्या नियोजनाचा ‘मुहूर्त’

परिषदेतर्फे नियोजनाला प्रारंभ; नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आयोजन
Published on

पुणे, ता. १० ः गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्याने संमेलनाचा मार्ग मोकळा झाला होता. या कार्यकारिणीच्या नियामक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत शतक महोत्सवी संमेलनाच्या नियोजनाचा ‘मुहूर्त’ ठरला.

नियामक मंडळाच्या बैठकीत या संमेलनाच्या नियोजनाविषयी चर्चा झाली. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी संमेलनाला प्रारंभ व्हावा. तर, २७ मार्च २०२४ ला, म्हणजेच जागतिक रंगभूमी दिनी संमेलनाचा समारोप करावा, अशी कल्पना या बैठकीत मांडण्यात आली. संमेलनाची रूपरेषा आखण्यासाठी या बैठकीत समन्वय समितीचीदेखील नियुक्ती केली आहे.

शंभरावे संमेलन असल्यामुळे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे मुंबईत मुख्य संमेलन व्हावे, अशी सूचना केली. त्यासह विभागवार किंवा जिल्हावार संमेलन भरवावीत का, यावर बैठकीत चर्चा झाली. संमेलनाचे अध्यक्षपद हे यापूर्वीच्या कार्यकारिणीने ठरवल्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याकडेच असेल. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी दिली. या बैठकीत यशवंत नाट्य संकुलाच्या नूतनीकरणासंदर्भातील खर्चाचे अंदाजपत्रकदेखील मंजूर केले.

यापूर्वीचे ९९ वे नाट्य संमेलन नागपूर येथे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. त्यानंतर २०२० मध्ये १०० वे नाट्य संमेलन सांगली येथे नियोजित होते. तसेच, शंभरावे नाट्य संमेलन असल्याने शंभर गावांमध्ये संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचाही नाट्य परिषदेचा मानस होता. मात्र, कोरोनामुळे हे संमेलन पुढे ढकले. त्यानंतर नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवरून वाद निर्माण झाला होता. परिणामी परिषदेचे कामच ठप्प झाले होते. यावर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. त्यामुळे संमेलनाचा आयोजनाचा मार्ग मोकळा झाला.

संमेलनाच्या समितीत पुण्याचे दोन सदस्य
शंभराव्या नाट्य संमेलनाच्या नियोजनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत पुण्यातील दोन प्रतिनिधींची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेचे सहकार्यवाह सत्यजित धांडेकर आणि परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले या दोघांचा या समितीत समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.