पुणे महापालिकेचे कामकाज ठप्प

पुणे महापालिकेचे कामकाज ठप्प

पुणे, ता. १० ः पुणे महापालिका सगळा कारभार ऑनलाइन करण्याच्या प्रयत्नात असताना रविवारी इंटरनेट बंद पडल्यानंतर २४ तासानंतरही ते सुरू करण्यास अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे सोमवारी संपूर्ण दिवस महापालिका भवनासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह इतर कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले होते. त्याचा मोठा फटका प्रशासकीय कामाला बसला.
पुणे महापालिकेत नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, त्यावर आवक जावक क्रमांक टाकणे, कार्यालयीन पत्रांची ऑनलाइन नोंद करणे, निविदा प्रक्रियेसाठी ऑनलाइन माहिती भरणे, कागदपत्र अपलोड करणे, इमेल पाठविणे, विविध विभागातून येणाऱ्या इमेलवर पुढील कार्यवाही करणे यासह इतर कामे ऑनलाइन सुरू असतात. प्रत्येक गोष्टीची नोंद सॉफ्टवेअरला होते. त्यामुळे इंटरनेट सुरू असणे आवश्‍यक आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी नागरिकांची मोठी वर्दळ महापालिकेत होती. अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिले जात होते. क्षेत्रीय कार्यालयांमध्येही हीच स्थिती होती. पण इंटरनेट बंद असल्याने नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत.
महापालिकेतील मुख्य सर्व्हर रुममध्ये राऊटर खराब झाल्याने इंटरनेट बंद पडले होते. ते दुरुस्तीसाठी रविवारपासून प्रयत्न सुरू होते. तर काही ठिकाणी केबल तुटल्या असल्यानेही इंटरनेट बंद होते असे संगणक विभागाकडून सांगण्यात आले आहे. पण स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या महापालिकेला व संगणक प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च केला जात असताना इंटरनेट बंद पडल्याचा मोठा फटका कामकाजाला बसला आहे.
मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांकडून ९० टक्के ऑनलाइन प्रणालीला पसंती देतात. पण ही प्रकिया बाधित झाली नाही. नागरिकांना ऑनलाइन पैसे जमा करता आले आहेत. मात्र मिळकतकर विभागातील नाव बदलणे, नव्या इमारतींचे असेसमेंट करणे यासह अंतर्गत कामकाज ठप्प झाले होते. तसेच जन्म मृत्यू विभागात २०१९ पूर्वीचे जन्माचे किंवा मृत्यूचे दाखल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना दाखला मिळाला नाही. पण केंद्र सरकारची सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) सुरू होती, त्यामुळे २०१९ नंतरचे ज्यांना दाखले हवे होते त्यांना कोणतीही अडचण आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवारी राऊटर्स खराब झाल्याने इंटरनेट बंद पडले होते. ते दुरुस्तीसाठी आमचे प्रयत्न सुरू होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण होइल असे अभियंत्यांनी सांगितले होते. त्यास उशीर लागत असून, रात्री नऊपर्यंत इंटरनेट सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेतूनच क्षेत्रीय कार्यालयांसाठी इंटरनेट कनेक्ट केले आहे. त्यामुळे तेथील इंटरनेटही बंद होते.
- राहुल जगताप, प्रमुख, संगणक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com