रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा सुखद अनुभव

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा सुखद अनुभव

पुणे, ता. ११ : बऱ्याचदा रिक्षातून प्रवास करणारे काही ग्राहक त्यांना आलेल्या बरे-वाईट अनुभवावरून रिक्षाचालकांबद्दल बोलत असतात. काही बोटांवर मोजण्याइतक्या रिक्षाचालकांमुळे सर्वांकडे मग त्याच दृष्टीने पाहिले जाते. परंतु एका महिला प्रवाशाला रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा सुखद अनुभव आला...
त्याचे झाले असे की, मुंढवा-केशवनगर परिसरातील रिक्षाचालक संतोष किसनराव शिंदे हे त्या भागात रिक्षा चालवतात. त्यांनी एका महिला प्रवाशाला मुंढव्यातून केशवनगरमधील एका शाळेजवळ सोडले. त्या महिलेने ठरल्यानुसार रिक्षाचे भाडे दिले. त्यानंतर ती महिला निघून गेली. रिक्षाचालक शिंदे हे दुसऱ्या ग्राहकाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी त्यांना रिक्षाच्या मागील सीटवर महागडा मोबाईल दिसला. त्यांनी लगेचच त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ती महिला आढळली नाही.
अखेर शिंदे यांनी तो मोबाईल मुंढवा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांच्याकडे आणून दिला. एक महिला प्रवासी रिक्षात तो मोबाईल विसरून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दुसरीकडे ती महिला मोबाईल हरविल्यामुळे चिंतेत होती. त्या महिलेने त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. त्यावर महानोर यांनी त्या महिला प्रवाशास घडलेला प्रकार सांगितला. संबंधित रिक्षाचालकाने तुमचा मोबाईल मुंढवा पोलिस ठाण्यात जमा केला आहे, आपण तो घेउन जा, असे सांगितले. त्यानुसार ती महिला पोलिस ठाण्यात पोचली. पोलिसांनी तो मोबाईल त्याच महिलेचा असल्याची खात्री करून त्यांना तो परत केला. रिक्षाचालक शिंदे यांची घरची जेमतेम परिस्थिती. परंतु कोणत्याही मोहाला बळी न पडता रिक्षाचालक शिंदे यांनी तो महागडा मोबाईल परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे आणि पोलिस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे यांनी शिंदे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com