दहा वर्षांनंतर ‘ती’ खळखळून हासली!

दहा वर्षांनंतर ‘ती’ खळखळून हासली!

पुणे, ता. ११ : दहा वर्षांपासून ‘ती’ खुर्चीवर बसत नव्हती...गादीवर झोपत नव्हती...दिवसांतून दोन-चार वेळा साडी बदलावी लागत होती... कारण, तिला मूत्रनियंत्रण होत नव्हते. दोन-दोन शस्त्रक्रिया करूनही समस्या सुटत नव्हती. अखेर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्यानंतर दहा वर्षांनी ‘ती’ मोकळेपणाने वावरली. कोणताही दबाव न घेतला खळखळून हासली.
नगरवरून एक महिला बाह्यरुग्ण विभागात आली. डॉक्टरांनी तिला बसायला सांगितले. पण, ती समोरच्या खुर्चीवर न बसता चक्क मांडी घालून खाली बसली. डॉक्टरांनी खाली का बसला म्हणून तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली, ‘‘अनियंत्रित मूत्र विसर्जनामुळे खुर्चीचे कुशन ओले होईल. मी गादीवर बसत नाही, झोपत नाही. त्यालाही हेच कारण आहे.’’

काय होती समस्या?
‘‘निसर्गाने आपलं शरीर अदभूत अभियांत्रिकी तंत्राने घडविले आहे. मूत्र विसर्जन करताना स्नायू उघडतो व नंतर तो स्नायू आपोआप बंद होतो. पण, या महिलेचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करताना मूत्रमार्ग योनीमार्गाला जोडला गेला. त्यातून महिलेचे मूत्रनियंत्रण सुटले. त्यासाठी दोन-दोन शस्त्रक्रिया करूनही जोडलेले मार्ग पूर्ववत करता आला नाही. त्यामुळे तिचे आयुष्य दहा वर्षांपासून खडतर झाले होते. सतत मूत्र बाहेर येत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमधून जाणे बंद झाले होते. तिला पॅड लावावे लागायचे. न बोलता येणाऱ्या अशा समस्या ‘ती’ एक दशक सहन करत होती,’’ बाणेर येथील युरोकुल रुग्णालयाचे प्रमुख मूत्ररोग विशेषज्ज्ञ आणि जागतिक यूरोलॉजिकल सोसायटीचे डॉ. संजय कुलकर्णी बोलत होते.

असे केले उपचार
- तिला रुग्णालयात दाखल करून दुसऱ्या दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
- मूत्रमार्ग योनीमार्गापासून दूर केला.
- या दोन्हींच्या मध्यभागी पोटातील चरबी, त्याला वैद्यकीय परिभाषेत ओमेंटम म्हणतात, याची भिंत तयार केली.
- रुग्णाला दोन ते तीन दिवसांमध्ये घरी सोडले.
- साधारणपणे तीन आठवड्यांनी कॅथेटर काढायला ती महिला परत आली.
- कॅथेटर काढल्यानंतर अनियंत्रित मूत्र विसर्जन पूर्ण थांबले होते.
- त्या दिवशी प्रथमच ती खळखळून हासली

जगभरातील ‘ट्रेंड’ काय?
आफ्रिकी देशांमध्ये विशेषतः सबसाहरन वाळवंटी प्रदेशात सुमारे दहा लाख स्त्रियांना ही समस्या भेडसावत आहे. नामीबिया, घाना नायजेरिया, टांझानिया, केनिया अशा अनेक देशांमधून अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण जागतिक यूरोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

अशा समस्यांवर महिलांना सहजपणे बोलता येत नाही. त्यामुळे वर्षांनवर्षे त्या मुकेपणाने या समस्या सहन करतात. आधुनिक काळात वैद्यकशास्त्रात प्रगती झाली आहे. अशा समस्येचे अचूक निदान आणि त्यावर प्रभावी उपचार शक्य झाले आहेत. त्यामुळे अशा समस्या सहन करत जीवन जगण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. रुग्णांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाऊन यावर सल्ला घ्यावा.
- डॉ. संजय कुलकर्णी, मूत्ररोग तज्ज्ञ, युरोकुल रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com