यंदा पुरुषोत्तम करंडक कोणाचा...?

यंदा पुरुषोत्तम करंडक कोणाचा...?

Published on

पुणे, ता. ११ ः पुरुषोत्तम करंडक स्पर्धा म्हटल्यावर विजेतेपद पटकावलेल्या संघाने ‘करंडक कोणाचा...’ अशा आरोळीसह आपल्या महाविद्यालयाच्या नावाचा जयघोष करणे, हे चित्र नित्याचेच. पण गतवर्षी प्रथम क्रमांकाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ कोणालाच न मिळाल्याने ही संधी विद्यार्थ्यांना मिळालीच नव्हती. मात्र आता ते शल्य दूर करून करंडक पटकावण्याची आणि अभिमानाने जल्लोष करण्याची वेळ आली आहे. कारण पुरुषोत्तम करंडकाचे बिगूल वाजले आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठीचे अर्ज वाटप येत्या शुक्रवारी (ता. १४) आणि शनिवारी (ता. १५) करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात, म्हणजेच शुक्रवार पेठेतील १२०५, विवेक अपार्टमेंट येथे अर्ज वाटप होणार आहे. संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ३ व ४ ऑगस्टला अर्ज स्वीकृती, ७ ऑगस्टला लॉट्स, १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्राथमिक फेरी आणि ९ व १० सप्टेंबरला अंतिम फेरी, असे स्पर्धेचे वेळापत्रक असेल.
नाट्यक्षेत्रात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेला मोठी परंपरा लाभली आहे. याच स्पर्धेतून अनेक चतुरस्त्र कलाकारांना मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राची वाट खुली झाले आहे. गतवर्षी मात्र स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अनेक रंगकर्मींनी नाराजीही व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांनी मात्र स्वतःतील उणिवा दूर करून पुढील वर्षी जोमाने पुनरागमन करण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे यंदा त्याच जिद्दीतून हे तरुण रंगकर्मी कोणते नवे प्रयोग सादर करतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यंदा तिकिटे ऑनलाइनदेखील
स्पर्धेची खिडकीवरील तिकडे लगेच संपत असल्याने स्पर्धा पाहू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तसेच इतरही रसिकांना स्पर्धेची तिकिटे मिळण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन संस्थेने यंदाच्या वर्षीपासून प्राथमिक फेरीच्या सीझन तिकिटांची ऑनलाइनही विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन तिकीट विक्रीला १४ जुलैपासून सुरू होणार असून https://www.ticketkhidakee.com/ या संकेतस्थळावर ती उपलब्ध असतील.

‌‘उच्छाद’ दीर्घांक रविवारी
महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस राजाभाऊ नातू यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी (ता. १६) सायंकाळी ६.३० वाजता भरत नाट्य मंदिरात ‌‘उच्छाद’ या दीर्घांकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, सिद्धेश धुरी, निरंजन पेडणेकर यांच्या यात भूमिका असून दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. प्रयोग सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.