अल्पवयीन मुलांचे मन‘परिवर्तन’!

अल्पवयीन मुलांचे मन‘परिवर्तन’!

पुणे, ता. १८ : स्थळ-कासेवाडी. मंगळवारी दुपारचे दोन वाजलेले. स्वयंसेवी संस्थांच्या समुपदेशक साधारण १४ ते १७ वयोगटांतील मुलांच्या अडचणी जाणून घेत होत्या. मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी किंवा नकळत गुन्हा केला त्या मुलांचे समुपदेशन सुरू होते. त्या मुलांना बोलते करीत होत्या. शाळेत जाता का? उत्तर हो. काय आवडतं? चायनीज. मोबाईलवर रील्स बघतो, अशी ती मुले सांगत होती. हे सर्व सुरू असताना एका मुलाचे वडील दारूच्या नशेतच पोचले, हे काय चाललंय? त्यावर समुपदेशन करणाऱ्या महिलेने त्यांना ‘आम्ही मुलांच्या अडचणी जाणून त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण देणार आहोत’, असे सांगितले. त्यावर मुलाच्या वडिलांनीही त्याला होकार दिला. केवळ बालगुन्हेगारी वाढतेय असे म्हणत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यामागची कारणे शोधून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे पोलिस काम करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शहरातील झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये ऑपरेशन ‘परिवर्तन’ प्रकल्प राबविण्यास सुरवात केली आहे.
शहरात वाहनांची तोडफोड, मारामारीच नव्हे तर चक्क कोयते हातात घेत दुखापत करणे, दहशत माजविण्यासारख्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी काही गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांचा वापर करून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करून सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पुढाकार घेतला आहे. ‘शीतल अस्तित्व’, ‘मनोदय’ व्यसनमुक्ती संस्था आणि ‘तेर देस होम’ या संस्थेच्या मदतीने ऑपरेशन ‘परिवर्तन’ अभियानात शहरातील सर्व झोपडपट्ट्या, वस्त्यांच्या परिसरात कार्यशाळांतून समुपदेशन करून रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक-व्यावसायिकांचीही मदत घेतली जाणार आहे.

वस्त्यांमध्ये काय आढळून आले?
- कोरोनानंतर काही मुले शाळेत पुन्हा गेली नाहीत. काही मुले मोबाईलवर रील्स पाहतात.
- व्यसनाधीन वडिलांकडून मुलांना दुकानातून दारू आणण्यास सांगितली जाते.
- सराईत गुन्हेगारांकडून मिळणाऱ्या जेमतेम पैशांतून मौजमजा
- शिक्षणाचा अभाव, वस्तीमधील वातावरण, आर्थिक अडचण ही प्रमुख कारणे.

पुणे पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘परिवर्तन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानात शहरातील पाच हजार अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या मदतीने मुलांना रोजगारासाठी कौशल्य विकास उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

शाळा सुटल्यानंतर किंवा शालाबाह्य मुले काय करतात, याचे निरीक्षण करण्यात येत आहे. मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेत आहोत. अल्पवयीन मुलांचे समुपदेशन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी पोलिस, शिक्षक, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहोत. मुलांची मानसिकता आणि बालहक्क याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- डॉ. गायत्री कोटबागी, सहायक प्राध्यापक आणि सचिव, ‘शीतल अस्तित्व’

शहरात कासेवाडी, लोहिया नगर, पाटील इस्टेट यासह सर्व वस्त्यांमधील पाच हजार अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. मुलांना व्यसनापासून परावृत्त करणे, शालाबाह्य मुलांना
पुन्हा शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. तसेच, मुलांची मानसिकता आणि व्यवसायातील कल बघून त्यांना स्वयंरोजगाराचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- संदीपसिंह गिल, नोडल ऑफिसर आणि पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१

‘भरोसा सेल’कडून समुपदेशन
पुणे पोलिसांकडून ‘भरोसा सेल’चे बाल सुरक्षा पथक, ‘पोलिस काका’ आणि ‘पोलिस दीदी’ यांच्या माध्यमातूनही शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. भरोसा सेलमधील ‘होप फॉर द चिल्ड्रेन’, ‘पंख फाउंडेशन’ आणि ‘मुस्कान’ या स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत.

पुणे शहर सद्य:स्थिती (२० डिसेंबर २०२२ ते १७ जुलै २०२३)-
- अल्पवयीन मुलांवर दाखल गुन्हे - १२८
- गुन्ह्यात सहभागी असलेली अल्पवयीन मुले - १७८

समुपदेशनासाठी संपर्क
९५७९३८९७५०
९८५०३१६७८३
९७६३९२२७७२
९७६३०७८१७०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com