धरणांचा पाणीसाठा दहा ‘टीएमसी’वर

धरणांचा पाणीसाठा दहा ‘टीएमसी’वर

पुणे, ता. १८ : गेल्या २४ तासांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे १.०४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला महिनाभर पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. दरम्यान, चारही धरणातील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून सध्या १०.०९ टीएमसी म्हणजेच ३४.६१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांत मिळून ९.०५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत १०.०९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला. गेल्या २४ तासांत १.०४ टीएमसी पाणी धरणांमध्ये जमा झाले आहे. शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यामुळे शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा गेल्या २४ तासांत जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ७५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४४ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात ४८ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात नऊ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे २० मि.मी. आणि १६ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला.

धरणसाठा
धरण - पाणीसाठा
टेमघर - ०.७ टीएमसी (२१.१८ टक्के)
वरसगाव - ४.५१ टीएमसी (३५.१८ टक्के)
पानशेत - ३.८९ टीएमसी (३६.५५ टक्के)
खडकवासला - ०.९० टीएमसी (४५.७२ टक्के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com