गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

वाघोलीतील गोदामातून ६५ लाखांचे मोबाईल लंपास

पुणे : वाघोली परिसरातील एका गोदामातून चोरट्यांनी ६५ लाख ६१ हजार रुपये किमतीचे १०५ मोबाईल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार १५ जुलैच्या मध्यरात्री घडला. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक वैभव सुदाम झेंडे (वय ३७, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली. त्यावरून लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरक्षेची जबाबदारी असलेले झेंडे रात्री गोदाम बंद करून घरी गेले. त्यावेळी चोरट्यांनी गोदामाचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरी केली.
--------
आंबेगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार
पुणे : आंबेगाव बुद्रूक परिसरात रविवारी रात्री पाच-सहा तरुणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. अर्जुन मोहन बेलदरे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत रोशन गणेश नवले (वय २१, रा. आंबेगाव बुद्रूक) याने फिर्याद दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ऋषिकेश चांगदेव घुटे (वय २३, रा. मोहननगर, धनकवडी) याला अटक केली. रोशन आणि अर्जुन हे दोघे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भाजीच्या स्टॉलजवळ उभे होते. त्यावेळी ऋषिकेश आणि त्याच्या साथीदारांनी अर्जुनवर हल्ला केला.
---------
सिंहगड रस्त्यावर तरुणीचा मृत्यू
पुणे : गतिरोधकाजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे भरधाव रिक्षातून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावर १५ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सपना राम राठोड (वय ३०, रा. लिपाने वस्ती, जांभूळवाडी) असे मृत्युमुखी तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची आई अंजनाबाई हरिदास आडे (वय ५०, रा. जांभूळवाडी) रस्ता यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पर्वती पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी नवले पूल येथून रिक्षातून डेक्कन परिसरात जेवण करण्यासाठी जात होती.
------ 
एसबीआयचे एटीएम फोडून १३ लाखांची चोरी

पुणे : एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १३ लाख ३४ हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवार पेठेतील फडके हौद चौकात १० जुलै ते १५ जुलैदरम्यान घडली.
याबाबत बॅंकेच्या उपव्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी गॅस कटर आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडले. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर करीत आहेत.
-------

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला लुटले

पुणे: चोरट्यांनी झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना विश्रांतवाडीजवळ शांतीनगरमध्ये घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याबाबत सिद्धेश्वर कृष्णा सोळंके (वय २६, रा. केसनंद फाटा, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. रोहित सदाकळे (वय २१), साहिल पिरूमल (वय २१, दोघे रा. शांतिनगर, येरवडा) आणि विक्रम देवकुळे (वय २०, रा. बोपखेल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिद्धेश्वर सोळंके हे जेवणाची ऑर्डर देवून परत येत असताना चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडील दीड हजार रुपये आणि आधार कार्ड, वाहन परवाना जबरदस्तीने हिसकावून घेतला.
-------- -

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com