महापालिका प्रशासन सज्ज!

महापालिका प्रशासन सज्ज!

पुणे, ता. २६ ः खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. विसर्ग जसाजसा वाढत जाईल तशी मुळा-मुठेच्या काठावरील स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांना सूचना देण्यापासून ते वायरलेस व्हॅन, वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी सतर्कतेच्या घोषणा देण्याची व्यवस्था तसेच अग्निशमन दलालाही सज्ज ठेवले आहे. नागरिकांचे तत्काळ स्थलांतर व त्यांना मदत केंद्रे उपलब्ध करून देण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे.
खडकवासला धरण साखळीमध्ये काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर नदीकाठी असणाऱ्या पुणे स्टेशन येथील ताडीवाला रस्ता वस्तीमधील स्वीपर चाळ, भीम संघटना, सारीपुत्त बुद्ध विहार, विश्‍वदीप तरुण मंडळ, भैय्यावाडी, बोपोडी व पाटील इस्टेट वस्त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. याबरोबरच सिंहगड रस्ता, बाणेर, औंध, बोपोडी येथील नदीकाठच्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने स्थानिक नागरिकांना महापालिका प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
बोपोडीतील वस्तीत मागील वर्षी नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. त्यावेळी स्थानिक नागरिक, अग्निशमन दल, पोलिस यांनी तेथे तत्काळ धाव घेत ज्येष्ठ, गरोदर महिला, लहान मुलांची सुटका केली होती. म्हणून यावर्षी महापालिका प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसू नये, यासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे.

उचललेली पाऊले
- पुराचा फटका बसू नये, यासाठी शहरातील नदीकाठच्या १० ठिकाणांवरील वस्त्या, सोसायट्यांमधील रहिवाशांना महापालिकेने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
- महापालिकेची वायरलेस व्हॅन, अग्निशामक दल व वाहतूक पोलिसांकडून संबंधित परिसरात वेळोवेळी सतर्कतेच्या घोषणा देण्याची व्यवस्था केली आहे.
- क्षेत्रीय कार्यालये, सहाय्यक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.
- पूरस्थितीमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्याची उपाययोजनाही महापालिका प्रशासनाने केली आहे.
- नागरिकांसाठी लाइफ जॅकेट, रोप लॉन्चर, रबर बोट, ॲल्युमिनिअम बोट अशी बचाव साधने उपलब्ध आहेत.
- अग्निशामक दलाचे मध्यवर्ती केंद्र, सिंहगड रस्ता अग्निशामक केंद्र, कात्रज तलाव या ठिकाणी रबर बोट असणार आहेत.

या झोपडपट्ट्यांना धोका
१) पाटील इस्टेट
२) फुलेनगर
३) पुलाची वाडी
४) खिलारे पाटील नगर
५) अंबिल ओढा
६) बोपोडी हॅरिस पुलाजवळ

पाणी शिरण्याची ठिकाणे
७) शिवणे येथील नदीकाठचा भाग
८) कात्रज तलाव परिसर
९) औंध, जुना पूल, बाणेर व पाषाण येथील काही भाग
१०) सिंहगड रस्ता नदीकाठचा भाग

नदीकाठच्या नागरिकांना यापूर्वी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीवेळी नागरिकांच्या तत्काळ स्थलांतराची व्यवस्था केली आहे. ४१ मदत केंद्र तयार आहेत. तेथे कर्मचारी, वीज, पाण्याची व्यवस्था केली आहे.
- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

दरवर्षी नागरिकांना अगोदर सूचना दिल्या जातात. अद्याप महापालिकेकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पुरामुळे घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. खबरदारी घेतल्यास व योग्य
उपाययोजना केल्यास धोका टळू शकतो.
- निलम गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com