बहुआयामी, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व

बहुआयामी, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व

ज्येष्ठ गणितज्ज्ञ आणि लेखिका मंगला नारळीकर या बोलायला स्पष्ट आणि मृदू. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक, पण दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या आणि पटले तर ते खुलेपणे स्वीकारणाऱ्या. त्या बहुआयामी होत्या. स्वत: उत्तम सुगरण. शिवणकामातही उत्तम गती. अंक आणि पाढे मोजण्याची पद्धत तार्किकदृष्ट्या योग्य आणि सोपी कशी होईल, याविषयी त्यांनी आपले विचार आग्रहीपणाने मांडले. त्यांच्या कार्याविषयी...
- विश्वास काळे

मंगलाताई आणि माझा परिचय माझी पत्नी जयश्रीमुळे झाला. तिने रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मंगलाताईंची कीर्ती तिथे दुमदुमत होती. त्या एमएला गणित विषय घेऊन विक्रमी गुणांनी प्रथम आल्या होत्या. पुढे जवळपास २५ वर्षांनी आमच्या घरासमोर एक हात प्लास्टरमध्ये असलेल्या बाई समोरचे पार्लर उघडण्याची वाट बघत असलेल्या जयश्रीला दिसल्या. त्यांना पाहिल्याबरोबर त्या मंगलाताई नारळीकरच आहेत, हे लक्षात आले आणि तिने त्यांना ‘समोरच घर आहे, येता का?’ असे विचारले. त्यांनीही लगेच होकार दिला.
घरात बोलताना विंदा करंदीकरांच्या मुलगी आणि जावयाच्या घरी आलो आहोत, हे समजल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. ते त्यांचे रुईया कॉलेजमधील इंग्रजीचे आवडते प्राध्यापक होते. आमच्या जागृती सेवा संस्थेमध्ये गरीब वस्तीतील शाळेत जाणाऱ्या आणि न जाणाऱ्या मुलांसाठी पहिली ते दहावीपर्यंत पूरक अभ्यासवर्ग घेतले जातात, हे समजल्यावर त्यांनी चौकशी केली आणि मलाही तिथे शिकवायला आवडेल, असे आपणहून सांगितले.
मंगलाताई गणितातील डॉक्टरेट, विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.च्या मार्गदर्शक, भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये गणिताच्या ऑलिम्पियाडची तयारी करणाऱ्या मार्गदर्शक. आम्ही जरा घाबरतच सांगितले, ‘जागृतीतील मुले गणितात खूप कच्ची असतात, गणिती क्रियाही वारंवार शिकवायला लागतात, आई-वडील अशिक्षित, त्यामुळे घरात शिक्षणाचे महत्त्व कमीच, मुलांना अनेकदा रोजंदारीवर जावे लागते. त्यामुळे वर्गातील उपस्थिती कमी-जास्त होत असते. दहावीपर्यंत आलेली मुले जरा बरी असतात, त्यांना तुम्ही शिकवा.’ त्या हसत म्हणाल्या, ‘मला कोणत्याही वर्गाला अगदी पहिली-दुसरीलाही शिकवायला आवडेल. त्यांना शिकवणे आणि गणिताची गोडी लावणे आव्हानात्मक असते.’ मग त्या चक्क पहिली ते चौथीतील मुलांना शिकवायला येऊ लागल्या. लवकरच मुलांच्या उपस्थितीत वाढ झाली. विविध अनुभवांतून त्यांनी ‘गणिताच्या सोप्या वाटा’ हे पुस्तक लिहिले. त्याचा ‘जागृती’त शिकवताना उपयोग होत आहे.
मंगलाताईंनी लिहिलेली प्रवासवर्णने, ललित आणि वैचारिक लेखांबाबत त्यांच्याशी मोकळेपणे चर्चा करणे, हा समृद्ध करणारा अनुभव असे. गणित आणि भौतिकशास्त्रातील शंका आम्ही त्यांना आणि जयंतरावांना विचारात असू. त्याचे निरसन लगेच व्हायचे. ‘उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वाहते पाणी उलटसुलट का फिरते, हा प्रश्न विचारल्यावर दोन पाने भरून त्यांनी स्पष्टीकरण पाठवले होते.
मंगलाताईंनी एका मासिकात लोकमान्य टिळकांच्या ‘दि ओरायन’ या पुस्तकात टिळकांनी खगोलशास्त्र आणि गणिताच्या साहाय्याने वेदाच्या कालखंडाविषयीचे अनुमान कसे काढले आहे, त्याचे महत्त्व विशद करून सांगणारा लेख लिहिला होता. त्यात अनेक गणिती सिद्धांत आणि खगोलशास्त्रीय आकृत्यांची मांडणी केलेली होती. मंगलाताईंनी आपली अंक आणि पाढे मोजण्याची पद्धत तार्किकदृष्ट्या अधिक योग्य आणि सुलभ कशी होईल, याविषयीचे विचार आग्रहीपणाने मांडले. ‘विचारवेध’ या युट्यूब चॅनेलवरील त्यांचे विवेचन जरूर ऐकावे. यामागे लहान मुलांना गणित हा शत्रुपक्ष न वाटता बालवयातच गणिताची आवड निर्माण करण्याची तळमळ होती.
मंगलाताईंना ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार मिळाला होता. जयंतरावांना त्यांची भक्कम साथसंगत लाभली. मंगलाताईंच्या निधनाने जयंतरावांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरणाऱ्या गणितप्रेमींच्या व्यापक परिघात मोठीच पोकळी भासणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com