माणसं जोडणारा कामगार ते पुण्याचा खासदार!

माणसं जोडणारा कामगार ते पुण्याचा खासदार!

पुणे शहराचे राजकारण, समाजकारण ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव म्हणजे गिरीश बापट. ‘भाऊ’ या नावाने कार्यकर्त्यांना आपलासा करणारा हा सर्वसमावेशक नेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, टेल्को कंपनीतील कामगार, सलग तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पाच वेळा आमदार, मंत्री, विक्रमी मतांनी विजयी झालेले भाजपचे खासदार या कष्टातून उभ्या केलेल्या राजकीय कारकीर्द मागे होता त्यांच्यातील पक्षापलीकडचा, सर्वांना आपलासा वाटणारा ‘कार्यकर्ता’.
काही दिवसांपूर्वी कसब्यातील पोटनिवडणुकीत ऑक्सिजनच्या नळ्या लावून कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता महाराष्ट्राने पाहिला. पण बापट निवडणुकीपुरतेच पक्षाचे असायचे इतर वेळी विरोधकांनाही आपलेसे करणारा अवलिया अशीच त्यांची ओळख होती. राजकारणातील हा वेगळेपणा आणि अफाट जनसंपर्क हाच बापट यांचा श्वास होता. म्हणूनच बापट यांचे जाणे सर्वांना चटका लावणारे आहे.
गिरीश भालचंद्र बापट यांचा जन्म तीन सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडे येथे जिल्हा परिषदेत शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे माध्यमिक तर ‘बीएमसीसी’मधून त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवीनंतर बापट १९७३ मध्ये टेल्को कंपनीत कामगार म्हणून रुजू झाले. टेल्कोत असतानाच त्यांच्यातील नेत्याने आकार घेतला. २०१० पर्यंत त्यांनी टेल्कोत काम केले. १९७५ मध्ये आणीबाणीत १९ महिने नाशिक जेलमध्ये कारावास भोगला.
आणीबाणीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. रा. स्व. संघ, जनसंघ आणि परिवारातील विविध संस्थांवर त्यांनी काम केले. १९८० मध्ये ते भाजपचे शहर चिटणीस झाले. १९८३ मध्ये बापट यांनी त्यांची पहिली महापालिका निवडणूक लढविली आणि लोकप्रतिनिधी मधून सुरू झालेल्या कारकिर्दीस आज निधनानंतरच फूलस्टॉप मिळाला. बापट महापालिकेवर सलग तीन वेळा निवडून आले. महापालिकेत बापट यांचा वेगळा दबदबा होता. पक्षाची सत्ता नसताना १९८६ मध्ये ते महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष बनले. बापट यांनी कसब्याची पोट निवडणूक लढवली पण त्यांना यश मिळाले नाही. या पराभवानंतर मात्र बापट यांनी १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले. त्यानंतर २०१४ पर्यंत सलग पाच वेळा कसब्यातून विजयी होणारे ते एकमेव आमदार ठरले. कसबा मतदारसंघ निवडणुकीसाठी तसा अवघड. अठरापगड जाती, विविध विचारसरणीचे लोक तरीही या सर्वांना जोडून एकसंध ठेवणारा धागा म्हणजे बापट होते. कसबा भाजपसाठी तसा किती कठीण हे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत लक्षात आले.
पुण्यातील सर्वांत यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती. सत्ता कोणाचीही असो पुण्यातून बापट विधानसभेत येणार याची खात्री विरोधकांनाही असायची, यावरून त्यांनी मतदारांशी जोडलेल्या संबंधांचा अंदाज येतो. बापट राज्यस्तरावरील भाजप नेत्यांच्या पहिल्या फळीत राहिले.
१९९५ मध्ये भाजप - शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर बापट यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या काळात त्यांनी महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावला १९९९ मध्ये एसटी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. प्रत्येक तालुक्याच्या एसटी स्टँडला भेट देणारा अध्यक्ष अशी त्यांची ओळख राहिली.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्य अशा महत्त्वाच्या मंत्री पदावर त्यांनी काम केले. पुण्याचे पालकमंत्री म्हणून
त्यांच्यावर जबाबदारी होती. पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी - चिंचवड या दोन्ही महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पालकमंत्री झाल्यानंतर बापट यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. ‘पीएमआरडीए’ची स्थापना करून ते पहिले अध्यक्ष झाले. मेट्रो त्यांच्याच काळात मार्गी लागली. मंत्रिपदी असतानाच बापट यांनी पुण्यातून लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते विक्रमी तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.
बापट हे पुण्यातील राजकारणातील हेडमास्तर म्हणून ओळखले जायचे. पुण्यात भाजपने लोकसभेची जागा जिंकल्यानंतर आठही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळविला. यात बापट यांच्या संघटन कौशल्याचा महत्त्वाचा वाटा होता. कार्यकर्त्यांना सहज
उपलब्ध होणारा, कोणताही बडेजाव न करता हाकेला धावून येणारा, नागरी नियोजनाची दृष्टी असणारा नेता म्हणून ते पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com