व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद
व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : व्यापाऱ्याला भरदिवसा रस्त्यात मारहाण करून ४७ लाखांची रोकड लुटणाऱ्या तिघा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून ३० लाखांची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखा आणि फरासखाना विभागाने ही संयुक्त कारवाई केली.
किरण अशोक पवार (वय २७), आकाश कपिल गोरड (वय २१) आणि ऋषीकेश गायकवाड (वय २४, तिघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मंगलपुरी गोस्वामी हे नाना पेठेतील पन्ना एजन्सीत कामगार आहेत. ते २३ मार्चला बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात होते. त्यावेळी चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ४७ लाखांची रोकड हिसकावून नेली होती. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास फरासखाना विभाग आणि गुन्हे शाखेकडून सुरू होता.
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार युनिट-एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी किरण पवार आणि त्याचा साथीदार आकाश गोरड यांनी हा गुन्हा केल्याची माहिती सहायक फौजदार राहुल मखरे आणि पोलिस कर्मचारी दत्ता सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार दोघा आरोपींना अटक करून पाच लाख रुपये जप्त केले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलिसांना घटनास्थळी संशयित रिक्षा फिरताना आढळून आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकाने रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. रिक्षातील व्यक्ती गायकवाड हा आरोपींचा मित्र असल्याचे समोर आले. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल आणि सहायक आयुक्त गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, प्रमोद वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘मास्टरमाइंड’कडून २५ लाख जप्त
ऋषीकेश गायकवाड हा या एजन्सीकडे सेल्समन म्हणून कामास होता. त्याला कामावरून काढले होते. त्याला फिर्यादी रक्कम भरण्यासाठी बँकेत कधी जातात याची माहिती होती. गायकवाड हा मास्टरमाइंड असून, त्याच्या एकट्याकडून २५ लाखांची रोकड जप्त केल्याचे फरासखानाचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले. सहायक आयुक्त सुनील पवार आणि गोवेकर यांनी आत्तापर्यंत शहरातील महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.