
अजित पवारांनी काँग्रेसला फटकारले
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले आहेत. लगेचच पुण्याच्या खासदारकीसाठी पोटनिवडणुकीबाबत बोलणे योग्य नाही. माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेसला शुक्रवारी फटकारले.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यास काँग्रेसच ही निवडणूक लढेल, असे काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी जाहीर केले होते. पवार यांनी शुक्रवारी बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन वडेट्टीवार यांनी पोटनिवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर लगेचच पोटनिवडणूक, उमेदवार यावर चर्चा करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही. मी यावर काही बोललो, तर जनता म्हणेल यांना जनाची नाही, मनाची तरी काही आहे की नाही.’’
दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, धनंजय महाडीक यांच्यासह अशोक मोहोळ, कपिल पाटील यांनी बापट कुटुंबीयांचे भेट घेतली.
महाविकास आघाडीची सभा होणारच
महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वीच सभा ठरली आहे. तेथील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत करावी. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच सभा रद्द केल्यास संभाजीनगरमध्ये खूपच गंभीर परिस्थिती असल्याचा संदेश राज्यात जाईल. त्यामुळे ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीची सभा होणारच, असेही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट सांगितले.
देशातील सर्वच महापुरुषांबद्दल सर्वांनीच आदर राखायला हवा. समाजातील वातावरण दूषित होईल, असे वक्तव्य कोणीही करू नये. आता महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे, असा माझा कयास आहे.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते