
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान
पुणे, ता. २७ ः अरबी समुद्रात येत असलेली आर्द्रता, वायव्य राजस्थान व परिसरावर असलेले चक्राकार वाऱ्यांची स्थिती, त्यात या प्रणालीपासून उत्तर मध्य प्रदेशपर्यंत निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा. अशात राज्यात काही भागात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील कमाल तापमानाचा पारा खाली घसरत असून उन्हाबरोबर दमट व ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुंताश ठिकाणी पारा ४० अंशांच्या घरात असून शनिवारी (ता. २७) राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस इतकी झाली. मॉन्सूनची प्रगती ही अद्याप झालेली होत नसून गेल्या आठवडाभरापासून ते ‘जैसे थे’ स्थितीत आहे. दरम्यान, यातच राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती होत आहे. तर किमान तापमानात ही सरासरीपेक्षा घट पाहायला मिळत आहे.
रविवारी (ता. २८) मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र उन्हाची स्थिती असेल.
पुण्यात आठवडाभर उकाडा
पुणे शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर मुख्यतः निरभ्र वातावरण राहणार असून दुपारनंतर ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जात आहे. शनिवारी (ता. २७) शहरात ३५.६ अंश सेल्सिअस इतकी झाली. ऊन आणि दमट वातावरणामुळे उकाड्याची अनुभूती नागरिकांना पुढील आठवडाभर अशीच होणार आहे.