अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग
अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग

अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत १९ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर शहरातील आतापर्यत ३१९ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असली तरीही दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी ३० मे ते ६ जून हा कालावधी देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नवीन नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल करण्यासाठी २९ मे रोजी घेण्यात येणाऱ्या शिबिरात महाविद्यालयांना कागदपत्रासह सहभागी व्हावे लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

निकालानंतर भरता येणार भाग दोन
अकरावीच्या प्रवेशाच्या अर्जाचा भाग एक भरून तो प्रमाणित करण्याची प्रक्रिया २५ मेपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला लागण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असून यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.

(विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेली नोंदणी)
तपशील - अर्जांची संख्या
ऑनलाइन नोंदणी - १९,८२७
लॉक केलेले अर्ज - ९,३०१
ऑटो व्हेरिफाय - ३,९७१
मागे घेतलेले अर्ज - ३२