
‘आयटीआय’तर्फे उद्या करिअर शिबिराचे आयोजन
पुणे, ता. २८ : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (आयटीआय) छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या मंगळवारी (ता. ३०) बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रभारी उपसंचालक वाय. डी. कांबळे यांनी दिली.
शिबिरात इयत्ता दहावी आणि बारावीनंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, प्रदर्शन, आयटीआय कोर्सच्या पुढील शिक्षणातील संधी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम याची माहिती दिली जाईल. याशिवाय प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याबाबतही शिबिरात माहिती देण्यात येणार आहे. तसेच स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉलही शिबिरात असतील. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक या शिबिरात सहभागी होऊ शकणार आहेत, असे कांबळे यांनी सांगितले.